शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

शक्तिरूपेण संस्थिता (२)

सर्व भूतांच्या ठायी वास करणारी अनंतरूपा शक्ती, सार्वत्रिक असते. शक्ती नाही अशी टीचभरही जागा ब्रह्मांडात सापडणार नाही. सगळे देश, सगळे वेष, सगळ्या भाषा, सगळी भोजनं, सगळे भाव, सगळ्या कृती; शक्तीचा आविष्कार असतात. हे शक्तीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. शक्तीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे - शक्तीच्या आविष्काराचा हा प्रकार एकच असला तरीही त्याचे प्रमाण मात्र वेगवेगळे असते. कमी अधिक असते. हे प्रमाण सारखे नसते. म्हणूनच गायनाची शक्ती असलेले सगळेच पंडित जसराज, भीमसेन जोशी, प्रभा अत्रे, किशोरी आमोणकर किंवा लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, मोहंमद रफी, मुकेश, सुधीर फडके नाही होत. गायनाची शक्ती असलेले चांगले गायक, गायिका होऊ शकतात पण सगळेच एका मापाचे होऊ शकत नाहीत. खूप प्रयत्न केले तरीही. हे अन्य गोष्टींनाही लागू होतं. शक्तीच्या आविष्काराचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे - ती सर्वत्र असली तरी एकाच साच्यातली, एकाच गुणाची नसते. एकाच ठायी आर्थिक शक्ती, गायन शक्ती, कवित्व शक्ती, शरीर श्रमाची शक्ती, प्रशासन शक्ती, प्रेम शक्ती; अशा सगळ्या शक्ती असतात असं नाही. किंबहुना नसतातच. एकाहून अधिक शक्ती एकाच ठायी असू शकतात. परंतु हे प्रमाणही कमी असतं. सगळ्या शक्ती एकत्र हे तर नसतंच. त्यामुळेच सर्वगुण संपन्न होण्याचा ध्यास, अट्टाहास आणि प्रचलन अनेकदा निरुपयोगी तर अनेकदा हास्यास्पद ठरतात.

शक्तीच्या आविष्काराची ही विविधता आणि त्यांचे विषम प्रमाण ही वास्तवता असल्यानेच, कोणताही गुण, कला, शक्तीचा कोणताही आविष्कार यांची तुलना करणे, त्यांच्यात डावे उजवे करणे, त्यांची वर्गवारी करणे, त्या आधारे द्वेष, शोषण इत्यादी करणे; हे योग्य ठरत नाही. शिवाय प्रत्येकाला सगळ्या शक्तींची गरज नसते तरीही एकाहून अधिक शक्तींची गरज असतेच. जगण्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी, पूर्णतेसाठी; एकाहून अधिक शक्ती आवश्यक असतात. म्हणूनच क्षुद्रहृदयी संघर्षापेक्षा सहृदयी समन्वय उपयोगाचा आणि योग्य ठरतो. सहकार्य इत्यादी या समन्वयी वृत्तीचेच प्रकार, तर स्पर्धा हा अयोग्य अशा संघर्षाचा प्रकार.

शक्तीच्या या आविष्काराबद्दल दृष्टी कोणती आहे आणि हेतू काय आहे, यावरून तो आविष्कार प्रणम्य आहे की नाही हे ठरतं.

- श्रीपाद कोठे

८ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा