रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

आठवण दत्तोपंतंची

लवकरच स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यांनी स्वतःच सांगितलेली एक आठवण -

कामगार क्षेत्रात काम सुरू करायचं, संघटना उभी करायची असं निश्चित झालं. पण त्याबाबत माहिती, अनुभव काहीच नव्हतं. तेव्हा त्यासाठी कामगार क्षेत्रात आधीपासून असलेल्या इंटक या संघटनेत काही दिवस काम करण्याचं ठरवलं. १९५० च्या डिसेंबर महिन्यात त्यांची इंटकच्या जनरल कौन्सिलवर निवड झाली. त्यांनी स्व. भय्याजी दाणी यांना ती बातमी सांगितली. भय्याजी त्यांना गोळवलकर गुरुजींकडे घेऊन गेले. गुरुजींनी सगळं ऐकून घेतलं. सगळी माहिती विचारली. अन एक प्रश्न विचारला - 'तुम्ही कोणत्या मजुरांचे प्रतिनिधी म्हणून कौन्सिलवर गेले आहात?' दत्तोपंतांनी सांगितले - 'मँगनीज कामगार.' गुरुजींनी पुढे विचारले - 'किती सदस्य आहेत?' दत्तोपंत म्हणाले -'तीस हजार.' त्यावर गुरुजींनी विचारले - 'तुमची आई ज्या उत्कटतेने तुमच्यावर प्रेम करते तेवढ्याच उत्कटतेने तुम्ही या तीस हजार मजुरांवर प्रेम करता का? खरेखरे सांगा.' दत्तोपंतांनी उत्तर दिले - 'हो म्हणू शकत नाही.' त्यावर गुरुजी म्हणाले - 'मग तुम्ही इंटकच्याच जनरल कौन्सिलचे सदस्य बनू शकता, भगवंताच्या जनरल कौन्सिलचे नव्हे.'

गुरुजींनी त्यांना कामगार संघटनेच्या विषयात महात्मा गांधी आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा तौलनिक अभ्यास करण्यास सांगितले. या दृष्टीने काय वाचन सुरू आहे याची चौकशीही गुरुजी करीत असत.

(गुरुजींच्या निधनानंतर नागपूरच्या भारतीय विचार साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'श्री गुरुजी समग्र दर्शन' या ग्रंथमालिकेच्या तिसऱ्या खंडात ही आठवण आहे.)

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा