गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (१)

शक्ती उपासनेच्या दोन नऊरात्री. त्यातील यावर्षीच्या अश्विनी नवरात्राची आज सुरुवात. जगदंबेला नमन करताना म्हटलं जातं - 'या देवी सर्वभूतेषु'. त्यानंतर जगदंबेच्या स्वरूपाचा उल्लेख येतो. अन शेवटी नमन. म्हणजे सर्व भूतांच्या ठायी असलेल्या त्या त्या स्वरूपाला जगदंब भावाने नमन. केवळ स्त्रियांच्या ठायी वास करणाऱ्या स्वरूपाला नाही. स्त्री, पुरुष, तृतीय पंथी, पशू, पक्षी, प्राणी, निसर्ग; सगळ्यांच्या ठायी वास करणाऱ्या जगदंबेच्या स्वरूपांना वंदन.

सर्व भूतांच्या ठायी ज्या ज्या स्वरूपात जगदंबा वास करते त्यातील एक स्वरूप आहे शक्ती. शक्ती त्रिविधा असते. म्हणजे तीन प्रकारची असते. सात्त्विक, राजसी, तामसिक. अथर्वशीर्षातही म्हटलं आहे- त्वं शक्ती त्रयात्मिका. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली ही त्या शक्तीची साकार रूपं.

या तीन मूळ शक्तींचा अनंत रूपातील विलास जीवनात पाहायला मिळतो. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा विविध शक्ती असतात आणि अनुभवाला येतात. आकर्षण व अपकर्षण या शक्ती आहेत. सौंदर्य ही शक्ती आहे. आनंद ही शक्ती आहे. अन्नपूर्णा ही शक्ती आहे. संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, वक्तृत्व, लेखन, संवाद, मेधा, संघटन, एकांत, सातत्य, प्रेम, काम, लौकिक, दैवी, आध्यात्मिक, अभ्यास, ध्यान, उपासना, धर्म, कर्म, सैन्य, विद्युत, समर्पण, संघर्ष, समन्वय; एवढंच काय; वाफ, प्रकाश, अंधार याही शक्ती आहेत. होय, अंधार देखील. संध्याकाळी झाडावर, वेलीवर दिसणाऱ्या कळ्या, प्रकाश पसरला की फुल झालेल्या दिसतात. कळीचं फुल करणारी ही शक्ती अंधारशक्ती असते. गर्भ सुद्धा नऊ महिने अंधारातच वाढतो. अशी ही शक्ती अनंतरूपा असते. सर्वत्र, सर्वांठायी वसणाऱ्या या अनंतरूपा शक्तीला नमन.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ७ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा