आज शेवटली माळ. जगभरातील कोट्यवधी अनामिकांसाठी. उर्जस्वल ध्येयासाठी, जगाला प्रकाश देण्यासाठी, आपली चूलबोळकी अडगळीत टाकून जगाचा संसार चालवण्यासाठी जगणाऱ्यांना साथ देणाऱ्या शक्तीस्वरुपांसाठी. समाजकारण किंवा राजकारण, धर्म किंवा विज्ञान, शिक्षण किंवा सेवा, शेती किंवा वैद्यक, कला किंवा साहित्य... सगळ्या क्षेत्रात, सगळ्या जगभरात वावरणाऱ्या वेड्यांना- कधी पत्नी म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी आई म्हणून, कधी प्रेयसी म्हणून, कधी मैत्रीण म्हणून, कधी कुठलंही नाव न देता येणाऱ्या अनाम भावबंधातून; परंतु ज्यांना साथ देतात त्या वेड्यांच्या उर्जस्वल विचारांवरील, प्रेरणांवरील आस्थेतून; हे वेडे जे करतायत ते आपल्याला जमत नसेल, समजत नसेल, पण ते चांगलं आहे, खूप महत्वाचं आहे या जाणीवेतून प्रसूत झालेल्या समर्पणाच्या भावनेतून साथ देणाऱ्या या अनामिका... हां, नावेच घ्यायची तर लक्ष्मणाची उर्मिला, तुकोबांची जिजाई, सावरकरांच्या यमुनाबाई आणि वहिनी, डॉ. हेडगेवारांच्या वहिनी, गुरुजी गोळवलकर यांच्या मातोश्री, बाळासाहेब देवरस यांच्या आई, पुलंच्या सुनीताबाई, र. धों. कर्वेंच्या पत्नी, साधनाताई आमटे... नावे घेता येतील अशा असंख्य आणि ज्यांची माहितीही नाही अशा अगणित अनामिकांसाठी- आजची माळ.
- श्रीपाद कोठे
२१ ऑक्टोबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा