दिनकर मनवर यांच्या कवितेसंबंधात मी परवा एक पोस्ट आणि आज एक कविता पोस्ट केले. आज कवीचे स्वतःचे मनोगत वाचले. त्याला अनुसरून व्यापक परिघासाठी काही गंभीर मुद्दे-
- व्यवस्थात्मक जीवनाच्या विरोधात, सभ्यतेच्या संबंधात वेगळा विचार मांडणारा एक वर्ग आहे.
- व्यवस्था म्हटले की मर्यादा अपरिहार्यपणे येते. ती टाळणे अशक्य. व्यवस्था जितकी लहान तितकी ती मोकळी आणि त्यात वाट्याला येणारा अवकाश मोठा.
- आजच्या व्यवस्था दीर्घकाळ वाटचाल करीत जटील आणि महाकाय झाल्या आहेत.
- त्याच वेळी हेही खरे आहे की त्यांनी अनेक सकारात्मक, जीवनपोषक अशा गोष्टीही केल्या आहेत.
- मात्स्यन्याय कमी केला आहे. किमान लहान माशाला काही संधी दिल्या आहेत. मोठ्या माशांच्या मनात लहान माशांच्या संबंधात मऊ कोपरा काही प्रमाणात निर्माण केला आहे.
- ज्ञान, विज्ञान, जग, साधने, जगणे हे तर कोणीही नाकारू शकत नाही. हजारो मैलांवर आलेल्या भूकंपात धावून जाण्याची, कधीही न देखलेल्या कुपोषितांसाठी अन्नाचा घास काढून देण्याची आंतरिक संपन्नताही दिलेली आहे.
- व्यवस्थात्मक जगण्याला विरोध करणाऱ्यांना हे सारे सोडून द्यायचे आहे का? व्यवस्थेने मानवाला दिलेले दृश्य आणि अदृश्य नाकारायचे आणि टाकून द्यायचे आहे का?
- भारतीय संदर्भात व्यवस्था म्हणजे उच्च जाती आणि त्यांचा दुष्टपणा असे सोपे आणि बाळबोध समीकरण योग्य आहे का?
- व्यवस्थांनी केलेला कोंडमारा ही फक्त भारतीय व्यथा आहे का?
- व्यवस्थांनी केलेला कोंडमारा ऐहिक जीवनाचा आणि जीवनजाणिवांचा आहे की ऐहिकतेहून वेगळा?
- abstract हा शब्दच मुळात ऐहिकतेपेक्षा अधिक कशाचा तरी संकेत करीत नाही का?
- ऐहिकतेपेक्षा वेगळ्या, abstract, अदृश्य जाणिवांची उत्तरे वा समाधान दृश्य, ऐहिक संदर्भात, प्रतिकात, घटनांत, जगण्यात शोधण्याचा आक्रोशपूर्ण आटापिटा कितपत योग्य म्हणावा?
- मानवी बुद्धी, मानवी प्रयत्न, मानवी जाणीवा यांचे अपुरेपण स्वीकारायला; त्यांची मर्यादा स्वीकारायला नकार देण्याचा आडमुठेपणा सोडून द्यायला हवा की नको?
- हा आडमुठेपणा सोडल्याशिवाय पुढे जाता येईल का?
- श्रीपाद कोठे
६ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा