शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

आरोग्य

शरीराच्या आरोग्यासाठी हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्रपिंड; असं सगळं सुस्थितीत असावं लागतं. त्यांच्यावरच सगळं अवलंबून. पण ही सगळी मंडळी कोणाला दिसत नाही. त्यांचा साजशृंगार नसतो. त्यांची छायाचित्रे कोणी लावत नाही. मुख्य म्हणजे आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी इत्यादी या महत्त्वाच्या मंडळींकडे दुर्लक्षच करतात. मग झटका बसला की धावपळ होते. सगळं ठीकठाक करायची. कधी ठीकठाक होतं, तर कधी ठीकठाक होत नाही. ठीकठाक झालं तरी आधीसारखं नाही होत. वयोपरत्वे होणारा बिघाड ok. पण आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी इत्यादीमुळे होणाऱ्या बिघाडासाठी आपणच जबाबदार असतो.

समाजशरीराचं आरोग्यही हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्रपिंड; इत्यादींवर अवलंबून असतं. आपल्या शरीराप्रमाणे आपल्याला त्याचीही माहिती नसते. असं काही असतं हेच ठाऊक नसतं. मग त्याची निगा, काळजी काय घेणार? आपल्याच आरोग्यासाठी आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी नीट राखणारे थोडेच असतात. समाजाच्या आरोग्याचं काय घेऊन बसता?

- श्रीपाद कोठे

२२ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा