गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

अनुकरणीय

आमच्या जवळ एक सुपर मार्केट आहे. तिथे कधीही जा. श्रुतीमधुर भजने, गाणी, अभंग सुरूच असतात. स्पष्ट ऐकू येतील पण दोघांच्या बोलण्यात किंचितही अडथळा येणार नाही एवढ्या आवाजात. वाटलं तर दुर्लक्ष करा, वाटलं तर ऐका. त्यामुळे वातावरण पण छान असतं. आज मात्र बासरी वाजत होती. आत पाय ठेवताच हंसध्वनीचे स्वर कानावर पडले. गुणगुणतच सामान घेतलं. काउंटरवर बिल तयार झालं. त्या मुलीला विचारलं - काय वाजतं आहे? ओशाळून म्हणाली - नाही. तिला म्हटलं - तुझी परीक्षा नाही घेत. सहज विचारलं. याला म्हणतात राग हंसध्वनी. पेमेंट केलं अन पलीकडे बसलेल्या मॅनेजरकडे गेलो. त्यांना म्हटलं - तुम्हाला धन्यवाद. इतकी छान बासरी लावल्याबद्दल. त्यांनाही आनंद झाला. त्यांच्या दुकानाच्या या वेगळेपणाची दखल घेतल्याचा. म्हणाले - हो. छान आहे. श्रीकृष्ण वाजवत ती बासरी आहे. मनात म्हटलं - यांना आवड आहे. रसिक आहेत पण माहिती नाही. असो. त्यात काय? प्रत्येकाला शास्त्र माहिती असायलाच हवं असं कुठे आहे. त्यांनाही सांगून टाकलं. शास्त्रीय संगीतातील हा राग हंसध्वनी आहे. वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने कॉलर सरळ केली. सगळीकडेच, किमान जिथे जिथे शक्य असेल तिथे; असं सुमधुर काही वाजवायला, अनुकरण करायला काय हरकत आहे. एक ट्रेंडच सुरू व्हावा. सततच्या संस्काराने काही काळाने एक रसिक, लयबद्ध, तालबद्ध समाजही यातून तयार होऊन जाईल.

- श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा