गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

गांधीजी आणि चित्रपट क्षेत्र

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त काल पंतप्रधानांनी चित्रपट सृष्टीतील कलावंतांशी संवाद साधला. चांगली गोष्ट आहे. तसेही वाईट काही पाहू नये, बोलू नये, ऐकू नये. गांधीजींचीच तीन माकडे सांगतात ना ! अन गांधी बाजूला ठेवले तरी आपल्याला साधू (खरे तर संधीसाधू) व्हायचे असते ना? त्यामुळे पंतप्रधान कलावंतांना भेटले आणि गांधी विषयाची चर्चा झाली, हे चांगलेच झाले. या कलावंतांनी त्यांच्या मनोरंजन माध्यमातून गांधी जीवन, विचार यांना प्रसारित करण्याचे आश्वासन देखील दिले. हेही चांगलेच झाले. गांधीजी हे साधेपणा, अपरिग्रह, शारीरिक कष्ट, स्वभाषा, दारूबंदी यासारख्या विषयांचे प्रचंड आग्रही होते. स्वतःच्या जीवनात हे सारे आणण्याचा प्रयत्न म्हणजेच त्यांचे जीवन. अन त्यांचे जीवन हाच त्यांचा विचार. तर, या कलाकारांनी चित्रपटातून हे पोहोचवण्याचे आश्वासन दिलेले आहे. स्वतःच्या जीवनात गांधी उतरवण्याचे नाही. त्यांना तसे आश्वासन मागितलेही नाही कोणी आणि त्यांनी कोणाला तसे आश्वासन दिलेही नाही. कृपया याची नोंद आपण घेतलेली बरी. नाही म्हणायला, देशभर शिक्षण किंवा आरोग्य किंवा स्वच्छता किंवा अशाच एखाद्या क्षेत्रातील समाजाची संपूर्ण गरज; कोणाचीही कसलीही मदत न घेता/ न मागता; सरकारी जमिनी इत्यादींचीही मागणी न करता; समाजाच्या भल्यासाठी कार्यक्रम आयोजित करून समाजाच्याच खिशाला हात न लावता; पूर्ण करण्याची क्षमता चित्रपट कलावंतांची आहे. पण ते चित्रपट माध्यमाच्या धर्मात बसत नाही ना ! तेव्हा संपर्क चांगला झालेला आहे दोन क्षेत्रातला. चर्चा वगैरेही उच्च दर्जाचीच झालेली आहे. चित्रपट पाहण्याची आणि भारावून जाण्याची तयारी करायला सामान्य जनतेला अवधी मिळालेला आहे. बाकी मतदानाचे कर्तव्य करून देश घडवण्याचे काम आज करायचे आहेच आपल्याला.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा