दिवाळी सुरु झाली. येथून पुढे पाच दिवस सगळीकडे आनंद, उत्साह राहील; अन दिवेही राहतील. संध्याकाळी दिवे लावताना एक दिवा अधिकच लावू या आणि प्रार्थना करू या मिनिटभर सीमेवरील जवानांसाठी, शेतात राबणार्या शेतकर्यासाठी, आपल्याकडे काम करणार्या गडी माणसांसाठी, आपल्याशी संबंधित श्रीमंत- गरीब- स्त्री- पुरुष- वृद्ध- समवयस्क- बालके- मित्र- शत्रू- आपल्याला हसवणारे- आपल्याला रडवणारे- आपल्याशी सहमत- आपल्याशी असहमत- सगळ्यांसाठी, आपल्याला अज्ञात असणार्या सगळ्यांसाठीही, सगळ्या देशांसाठी, सगळ्या समाजांसाठी, पशु- पक्षी- वनस्पती- संपूर्ण सृष्टीसाठी, पंचमहाभूतांसाठी, आम्हाला अज्ञात सृष्टीसाठी, आमच्या पूर्वी पृथ्वीवर राहून गेलेल्यांसाठी, आमच्यासोबत राहणार्यांसाठी, आमच्यानंतर राहतील त्यांच्यासाठीही; अगदी सगळ्या सगळ्यांसाठी आणि सगळ्या सगळ्यासाठी. आपल्या कोणत्याही कृतीला शारीरिक, आर्थिक, भौगोलिक मर्यादा असतात. मनाला मात्र मर्यादा नसते. दिवाळीनिमित्त त्याला खर्या अर्थाने सर्वव्यापी करू या. ईशवादी असलो तरीही करू या, इहवादी असलो तरीही करू या. दिवाळीचे पाच दिवस एक दिवा आणि एक मिनिट आपल्यातील माणसासाठी आणि आपल्यातील ईश्वरासाठी देऊ या.
- श्रीपाद कोठे
३१ ऑक्टोबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा