रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (४)

आजूबाजूला एक नजर टाकली तरीही एक गोष्ट लगेच ध्यानी येते. ती म्हणजे, जगात सगळीकडे शक्तीसंचय सुरू आहे. शक्ती अर्जन सुरू आहे. व्यक्ती असो, समूह असो, देश असो, संस्था असो, संघटना असो; सर्वत्र शक्तीसंचय सुरू आहे. स्त्रिया, पुरुष, बालके, तृतीय पंथी, विविध भाषा, विविध व्यवसाय, विविध उद्योग, विविध मठ मंदिरे; सगळे शक्तीचा संचय करीत आहेत. पण या शक्तीसंचयाला शक्तीची उपासना म्हणता येईल का? दुर्दैवाने तसे म्हणता येत नाही. शक्तीसंचयाला सर्वमंगलाची जोड असेल तरच त्याला शक्तीची उपासना म्हणता येईल. अन शक्तीची उपासना असेल तरच शक्ती सुखदा होईल. अन्यथा नाही. कोणत्या देशाची शक्तीसाधना आज शक्तीउपासना म्हणता येईल? किंवा व्यक्ती जीवनातील शक्तीसाधना किती प्रमाणात शक्ती उपासना असेल? व्यक्ती जीवनात निश्चितच काही प्रमाणात शक्तीची उपासना पाहायला, अनुभवायला मिळेल. परंतु व्यक्तीजीवनाचा एकूण प्रवाह, जगण्याच्या प्रेरणा, जीवनाची मूल्ये, सामाजिक मान्यता असलेल्या जीवनाच्या कल्पना आणि धारणा; या शक्तीसंचयाला उपासना म्हणू देत नाहीत. व्यक्तीच्या आणि समूहाच्या आर्थिक आकांक्षा, कुरघोडीची सामाजिक चढाओढ, राजकीय वर्चस्वाची स्पर्धा, शस्त्रास्त्रांचे भांडार, स्वातंत्र्य समता आदी मूल्यांचा स्वार्थी वापर; अशा असंख्य गोष्टी आहेत; ज्या शक्ती संचयाला सर्वमंगलाच्या दिशेने जाऊ देत नाहीत. सगळं मीच करणार, सगळं मलाच मिळायला हवं, सगळं माझ्या मालकीचं; यासाठीच सगळ्या प्रकारच्या शक्तीचे अर्जन. अन या शक्तीच्या अर्जनासाठी तामसी शक्तींचा अपरिमित वापर हाच वर्तमान युगधर्म असल्याचे चित्र पाहायला मिळते. हा 'मी' एक व्यक्ती असेल किंवा एखादा समूह किंवा एखादा देश. म्हणूनच आर्थिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, वैज्ञानिक, कलात्मक, धार्मिक, लष्करी, शैक्षणिक, ज्ञानाचा; अशा सगळ्या शक्तीसंचयानंतरही व्यक्तिगत किंवा सामूहिक सुखाचे आणि आनंदाचे प्रमाण समाधानकारक नाही. हा शक्तीसंचय सुखदा होण्यासाठी शक्तीची उपासना व्हायला हवी. त्यासाठी शक्तीसंचयाला सर्वमंगलाची जोड हवी. ही जोड कशी देता येऊ शकेल?

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा