सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

आजच्या तीन लक्षणीय गोष्टी.

१) उत्तर प्रदेशातील हत्येच्या प्रकरणात मृतकाच्या परिवाराला अखिलेश सरकार ४५ लाख रुपये देणार.

(देशात रोज शेकडो खून होतात. सगळ्या सरकारांचे बजेट वाढतील आता. गुंडांनी गुंडगिरी करायची अन आपण भोगायचे. मदत करण्यासाठी काही निकषबिकश असण्याची काय गरज? राजा उदार असला म्हणजे झाले.)

२) आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तमाशा. कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी चक्क दिवाळीतील रॉकेटसारखे रॉकेट तयार करून त्यात कबुतर भरले. अन त्याची वाट पेटवून वर आकाशात पाठवले. आकाशात रॉकेटचा स्फोट झाला. कबुतरांचे काय झाले असेल आपण समजू शकतो. काय म्हणावे याला? बिनडोकपणा. राक्षसीपणा. उन्मत्तता. उन्माद. रानटीपणा. लोक तयार आहेत वा नाहीत हे न पाहता जी लोकशाही बोडक्यावर लादण्यात आली त्याचे तर हे परिणाम नाहीत?

३) एका गरबा मंडळाने (बहुतेक मध्य प्रदेशात) सहभागी होण्यासाठी अंगावर गोमूत्र शिंपडून व टिळा लावून येण्याचे बंधन घातले आहे. लगेच सार्वत्रिक राष्ट्रीय कावकाव सुरु झाली आहे. त्या मंडळाने लोकांनी त्यांच्या गरबा महोत्सवात आलेच पाहिजे असे तर फर्मान नाही ना काढले? ज्यांना त्यांची बंधने पटतात ते जातील. नाही ते जाणार नाहीत. कदाचित त्यांचा गरबा दुथडी भरून वाहील किंवा ओस पडेल. लोक अन मंडळ पाहून घेतील. त्यात बाकीचे विषय घुसवण्यात काय अर्थ. आम्ही खरंच स्वातंत्र्य मानतो?

- श्रीपाद कोठे

४ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा