मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (६)

सर्वमंगला शक्तीसाठी सद्भाव आवश्यक असतो. परंतु सद्भावांची कठोर परीक्षा पाहणारे क्षण अनेकदा आणि वारंवार येत असतात. कधी स्वतःच स्वतःची परीक्षा घेण्याचा प्रसंग येतो. अशा वेळी परीक्षा टाळण्याची प्रवृत्ती मोठी असते. पुष्कळदा अशा परीक्षेची कारणमीमांसा करण्याची वृत्ती असते. अनेकदा स्वच्छपणे परीक्षेला सामोरे जाऊनही, समजून उमजून परीक्षा अनुत्तीर्ण व्हावे लागते. जगाची आणि जीवनाची रीत लक्षात घेऊन हे सगळे समजूनही घेता येते. समजून घ्यावे लागते. त्यात वावगेही काही नसते.

याव्यतिरिक्त परिस्थितीदेखील सद्भावांची परीक्षा घेण्यात आघाडीवर असते. स्वतःला स्वतःची परीक्षा घ्यावी आणि द्यावी लागते तेव्हा काही गोष्टी आपल्या हाती असतात. त्यामुळे ती परीक्षा, आपण प्रामाणिक असू तर, तुलनेने सोपी असते. परिस्थिती जेव्हा सद्भावांची परीक्षा घेते तेव्हा मात्र आपल्या हाती फार काही नसते. त्यामुळे ती परीक्षा कठीण असते. अशा वेळी सद्भाव कायम ठेवून सर्वमंगला शक्तीचा आविष्कार ही एक साधनाच असते.

महाभारत युद्ध आणि भगवद्गीता हे या बाबतीत कालजयी उदाहरण आहे. युद्धातून पळ न काढणे, संघर्षाला पाठ न दाखवणे; हा गीतेचा संदेश आहे हे तर खरेच; पण तो संदेश नीट समजून घ्यायला हवा. एक लक्षात घ्यायला हवे की, पांडवांवरील अन्यायामुळे महाभारत युद्ध घडले. परंतु गीतेत श्रीकृष्णाने कुठेही त्याचा उल्लेखही केलेला नाही. अर्जुनाला युद्धप्रवृत्त करताना श्रीकृष्णाने कुठेही कौरव पांडव यांच्यातील वाद आणलेला नाही. गीतेत आत्मबोध सांगितला आहे, विश्वरूप दर्शन घडवले आहे. आणि या आत्मदर्शनाने झालेल्या उपरतीनंतर अर्जुन युद्धाला उभा झाला आहे. कोणत्याही युद्धाआधी हे आत्मदर्शन आवश्यक आहे. त्याशिवाय जो संघर्ष होईल त्यात अहंकार, स्वार्थ आणि विकार मिसळलेले राहतील. असा संघर्ष भूषणावह नाही. कारण तो लोण्याच्या गोळ्यासाठी दोन बोक्यांचा संघर्ष असेल. म्हणूनच कोणत्याही संघर्षाआधी संभ्रम निर्माण व्हायलाच हवा. अन त्या संभ्रमातून आत्मबोध हवा. नाही तर आले मनात अन केला संघर्ष असा प्रकार कधीच योग्य नसतो. गीतेचाही तो सांगावा नाही. संघर्ष हा सहनशीलता कमी पडली म्हणून नसावा, तो सत्य रक्षणासाठी असावा. अन आत्मबोधाशिवाय सत्यदर्शन शक्य नाही. संघर्षापासून दूर पळणे योग्य नसते पण हरघडी संघर्षसिद्ध असणेही योग्य नसतेच. संघर्षातील शक्तीचा आविष्कार सर्वमंगल होण्यासाठी संघर्षाआधी आत्मबोध आवश्यक ठरतो.

गीतेचा आणखीन एक संदेश आहे. 'यतो धर्मस्ततो जय:'. जिथे धर्म असेल तिथे जय असतो. पांडवांकडे धर्म (धर्मराज) होता म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने होते. धर्माची संघर्षक्षमता विशेष नव्हती. युद्धाच्या दृष्टीने तो कमकुवत होता. युद्धाची वेळ देखील धर्मामुळेच आली होती. तरीही पांडवांच्या मनात धर्माबद्दल अनास्था, अनादर नव्हता. त्यांनी धर्म सोडला नव्हता. त्यामुळेच संख्या आणि साधनांमध्ये कमी असूनही पांडवांचा पक्ष जिंकला. धर्म म्हणजेच संतुलन शक्ती. ही संतुलन शक्ती असेल तर आणि तरच ईश्वर साथ देतो आणि शक्तीचा सर्वमंगल आविष्कार होतो.

 - श्रीपाद कोठे

१२ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा