रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

दिनकर मनवर वाद

दिनकर मनवर यांच्या कुठल्याशा कवितेवरून गदारोळ चालला आहे. त्याला अनुसरून-

१) लिंगभावाचे शब्द, भाषा वापरल्याशिवाय दु:ख, वेदना, अभाव मांडता येत नाहीत का?

२) अशा प्रकारे अंगात आल्यासारखे न करता लिहिणारे आणि आव न आणता समाजासाठी खूप काही भरीव करणारे नाहीत का?

३) अशी भाषा वापरणे हा हक्क असू शकतो का?

४) बोलण्याच्या, लिहिण्याच्या ओघात, संतापाच्या ओघात, तिरीमिरीत अथवा भावनांच्या आत्यंतिक आवेगात अशी भाषा वापरणे समजून घेण्यासारखे असले तरीही; रोज रतीब घातल्यासारखे असंबद्ध, दर्जाहीन लिहिणे, बोलणे बरळत राहणे आणि शेकडो लोकांनी झुंडीने त्यावर टिवल्याबावल्या करणे; ही कोणत्या अर्थाने सृजनशीलता असू शकते?

५) अत्यंत दर्जाहीन, सवय म्हणून मुर्खपणा करणारे, सवय म्हणूनच नव्हे तर जाणूनबुजून अर्वाच्य लिहिणारे, बोलणारे, ठरवून हे करणारे आणि त्यांचे झेंडे नाचवणारे; हे समाजरूपी आंब्याच्या आढीतील सडलेले आंबेच आहेत.

६) मानवी जीवनात सगळ्या गोष्टींना स्थान आहे. अपरिहार्यता म्हणून किंवा तसेही. अगदी घाण, अश्लीलता, नग्नता, क्रूरता, पांचटपणा आदींनाही. पण त्यांचे त्यांचे स्थान आहे. आम्हाला स्थान आणि स्थितीची मर्यादा मान्य नसून आम्हाला वाटेल तिथे, वाटेल तेवढे, वाटेल तसे, वाटेल तेव्हा करीत राहू; हे म्हणणे, त्यासाठी आग्रही असणे आणि त्या म्हणण्याला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून उचलून धरणे ही बदमाशी आहे.

७) विधिनिषेधशून्यता म्हणजे सृजनशीलता असूच शकत नाही.

८) कोणालाही कुठेही घाण/ कचरा टाकण्याची, ओकण्याची परवानगी असू शकत नाही. तो हक्क तर असूच शकत नाही. घाण, कचरा, ओकाऱ्या; या शारीरिक असोत, मानसिक, बौद्धिक वा भावनिक असोत.

९) असे सडके आंबे कालप्रवाहात नेहमीच राहतात, पुढेही राहतीलच. पण ते असतात म्हणजे त्यांना राहूच दिले पाहिजे असे नाही.

१०) घाण होणे प्रकृतीचा स्वभाव असला तरीही घाण स्वच्छ करणे मानवी आणि दैवी आहे. मानवी आणि दैवी वृत्ती वाढल्याच पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

३ ऑक्टोबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा