हे विश्व शक्तीने ओतप्रोत आहे एवढंच नाही तर हे संपूर्ण विश्व हीच एक शक्ती आहे. विज्ञान सुद्धा एक प्रकारे हेच प्रतिपादन करतं. हे विश्व कशाचं बनलं आहे? हे विश्व ऊर्जा आहे की वस्तू? की सामान्य वस्तू (common matter), dark matter and dark energy? की एका महास्फोटातून हे विश्व जन्माला आलं? या सगळ्यांबद्दल असंख्य सिद्धांत आणि मतप्रवाह असले तरीही एक गोष्ट मात्र निश्चित की, या विश्वाचं आदिकारण हे शक्ती आहे आणि ती शक्ती अज्ञात आहे. महास्फोट झाला असेल तर कशाचा आणि कसा? Dark energy असेल तर तिचं स्वरूप काय? काहीही सांगता येत नाही. एवढंच सांगता येतं की या विश्वाच्या मुळाशी विलक्षण शक्ती आहे. हे सत्य व्यवहाराला लागू केलं की त्याची तर्कशुद्ध परिणती होते की, ती शक्ती आपण निर्माण केलेली नाही हे तर खरंच पण आपल्याला तिच्याबद्दल काही माहितीही नाही. म्हणजेच ती आपल्या मालकीची नाही. ती शक्ती आपली मालमत्ता नाही. अन हेच सत्य असेल आणि ते प्रामाणिकपणे मान्य करायचे असेल, स्वीकारायचे असेल तर आपल्या मनातली मालकीची भावना, स्वामित्वाची भावना पूर्ण टाकून द्यावी लागते. जी गोष्टच आमची नाही तिच्यावर हक्क कसा सांगता येऊ शकेल? तिची वाटणी कशी करता येऊ शकेल? तिच्यासाठी भांडणे, वाद आणि संघर्ष कसा करता येऊ शकेल? ईशावास्य उपनिषद या शक्तीला ईश्वरी शक्ती म्हणतं, तर विज्ञान dark matter and dark energy. वेगळे शब्द यापलीकडे त्याला वेगळा अर्थ नाही. या आदिशक्तीची विश्वातील गोळाबेरीज तेवढीच असते. ती कमी होत नाही वा वाढत नाही. कमी करता येत नाही आणि वाढवता येत नाही. म्हणजेच प्रत्ययाला येणारं जग म्हणजे फक्त रूपांतरण असतं. त्यामुळेच आपला पुरुषार्थ, आपला वस्तू संग्रह, आपली possessions यांना फारसा अर्थ उरत नाही आणि त्यासाठीची धावपळ अर्थहीन ठरते. भारतीय आध्यात्मधारा तर विज्ञानाच्या पुढे जाऊन म्हणते - matter and energy या दोन वस्तू नाहीतच. ते फक्त एकाच तत्वाचं रूपांतरण आहे. दृश्य आणि अदृश्य याही दोन गोष्टी नाहीतच. त्याही एकाच तत्त्वाचे रूपांतरण असते. त्या आदिशक्तीची गोळाबेरीज म्हणजे हे विश्व. जे कधी दृश्य असतं तर कधी अदृश्य, कधी energy असतं तर कधी matter.
- श्रीपाद कोठे
१३ ऑक्टोबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा