रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

लहान मूल

प्रत्येक स्त्री पुरुषाचा कुठे ना कुठे लहान मुलांशी संबंध येत असतोच. त्यांचे वागणे, स्वभाव, वैशिष्ट्ये, दुबळेपणा, खोडकरपणा याचाही अनुभव येत असतोच. अन त्यांच्या डांबरटपणाचाही अनुभव येतो. कधीकधी मुलाची खोडी, चूक, बदमाशी पकडली जाते. त्यावेळी तो बेमालूमपणे विषय टाळतो, विषयांतर करतो किंवा रडतो, चिडतो, त्रागा करतो किंवा अपवादाने का होईना हसून देतो. तो मान्य मात्र करत नाही. हे झालं बाहेरच्या लहान मुलाबद्दल. पण प्रत्येकाच्या आत स्वत:चीच प्रतिकृती वाटावी असं लहान मुल दडलं असतं. त्याच्या खोड्या, चुका, बदमाशी अन्य कोणाला समजण्याची शक्यता नसते. त्या आपल्या आपल्यालाच समजतात. कोणापुढे लाज वाटण्याची, कमीपणा वाटण्याची, ओशाळवाणे वाटण्याची, खाली पाहावे लागण्याची शक्यता नसते. तरीही व्यक्ती बाहेरच्या लहान मुलाप्रमाणेच विषय टाळणे, विषयांतर करणे, रडणे, चिडणे, त्रागा करणे किंवा अपवादाने हसून देणे या गोष्टी करते. कधी त्यातून धडा घेऊन पुढे जाते. मात्र पुष्कळदा धडा घेतही नाही. असे करावे, न करावे? ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याचे त्याचे उत्तर.

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा