सर्वमयी शक्तीचे आविष्कार कमीअधिक प्रमाणात आणि विविध प्रकारचे असतात, त्याचप्रमाणे परस्पर विरोधी असेही असतात. करुणा हादेखील शक्तीचा आविष्कार आहे आणि क्रौर्य हादेखील शक्तीचा आविष्कारच. भोग आणि त्याग दोन्ही शक्तीचेच आविष्कार. सक्रियता आणि संयम, कर्मशीलता आणि कर्मत्याग; सगळेच शक्तीचे आविष्कार. एकच शक्ती जर अशी परस्परविरोधी रुपात प्रकट होत असेल तर काय योग्य आणि काय अयोग्य? काय स्पृहणीय आणि काय त्याज्य? काय चांगलं आणि काय वाईट? ठरवायचं कसं? निर्णय कसा करायचा? त्याची कसोटी आहे सर्वमंगल. सर्वमंगलाची कामना, हेतू आणि प्रयत्न यासाठी होणारा शक्तीचा आविष्कार प्रणम्य ठरतो. याउलट सर्वमंगलाला छेद देणारा आविष्कार त्याज्य ठरतो. अगदी सर्वत्र, सर्वकाळी गौरवले गेलेले मातृत्वदेखील याला अपवाद ठरत नाही. म्हणूनच कैकेयीचे मातृत्व प्रणम्य ठरत नाही आणि राणी लक्ष्मीबाईचे मातृत्व प्रणम्य ठरते. राधेचे प्रेम प्रणम्य ठरते तर शूर्पणखेचे प्रेम प्रणम्य ठरत नाही. वर्तमानाचा विचार करतानाही मुलांना गैरमार्गापासून न रोखणारे मातृत्व गौरवास्पद नाही ठरू शकत. परंतु सर्वमंगलाचा हा निर्णय सोपा नसतो. अनेक पण परंतु त्यात असतात. गरजा, परिस्थिती, क्षमता, दबाव असे अनेक परिणाम करणारे घटक असू शकतात. अन ही आजची समस्या नाही. संत मीराबाईने तर म्हणूनच ठेवले आहे 'करम की गती न्यारी'. त्यामुळे सर्वमंगलाचा निर्णय कठीण असला तरीही तो अशक्य मात्र नाही. कृती करणाऱ्याचा कमीतकमी स्वार्थ, स्वतःच्या लाभहानीचा किमान विचार, मानापमानाचा अत्यल्प विचार; अशा काही गोष्टींच्या आधारे सर्वमंगलाचा निर्णय करता येऊ शकतो. सर्वमंगलाचा याचा अर्थ प्रत्येक वेळी सगळ्या जगाचा असा नाही. तर संबंधित सगळ्यांच्या मंगलाचा असा त्याचा अर्थ योग्य ठरेल. अशा प्रकारचा सर्वमंगलासाठीचा शक्तीचा आविष्काराच चांगला म्हटला जातो. सर्वमंगलाचा नसलेला शक्तीचा आविष्कार चांगला म्हटला जात नाही.
- श्रीपाद कोठे
९ ऑक्टोबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा