गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (८)

सृजनात्मक, स्थितिस्थापक आणि संहारात्मक अशी ही त्रिविधा शक्ती ज्यातून आविर्भूत होते ती आत्मशक्ती. आत्मशक्ती म्हणजे माझी अर्जित शक्ती नाही. आत्मशक्ती म्हणजे माझ्या 'स्व'रूपाची शक्ती. या आत्मशक्तीची जाणीव, बोध, व्याप्ती, स्वरूप जेवढं आकलन होतं; तेवढ्या प्रमाणात सृजनात्मक, स्थितिस्थापक आणि संहारात्मक शक्तीकडे पाहण्याची; या तीन शक्तींच्या उपयोगाची; आमची भावना आणि क्षमता अधिक अर्थपूर्ण होते.

त्या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने कृतींना आणि विचारांना लेबल लावणे थांबते, कृतींना आणि विचारांना price tag लावणे थांबते, कृतींना आणि विचारांना वेगवेगळ्या कप्प्यात बंद करणे थांबते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने एकांगीपण कमी होते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने स्वतःकडे तटस्थपणे पाहता येते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने जाळ्यात अडकणे किंवा फसगत होणे कमी होते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने एखादी गोष्ट अमुक ठिकाणी वा वेळी योग्य का आणि दुसऱ्या ठिकाणी वा वेळी तीच गोष्ट अयोग्य का हे कळू लागते. जसे सहानुभूती. मी बाकीच्यांबद्दल सहानुभूती बाळगणे हेच योग्य असते, पण सहानुभूतीची अपेक्षा बाळगणे सर्वस्वी चूकच. हे फक्त एक उदाहरण. सगळ्याच गोष्टींचे असे अनेक कोन, आत्मशक्तीच्या प्रत्ययानंतर लक्षात येऊ लागतात.

म्हणूनच शक्तीचे संपादन, शक्तीची आराधना, शक्तीची उपासना; आत्मशक्तीच्या भक्कम आधाराशिवाय अपूर्ण  आणि अहितकर राहतात. या जगात सुखी आणि समाधानी राहायचे असेल, या विश्वात पूर्णता प्राप्त करायची असेल, या विश्वाला नंदनवन बनवायचे असेल, या विश्वाचा सुमेळ बसवायचा असेल; तर शक्तीची आराधना करावीच लागते. शक्तीची ही आराधना हितकर व्हावी यासाठी आत्मशक्तीचा ध्यास घ्यावा लागेल. त्यासाठी हवे आपल्या मर्यादित अस्तित्वाचे सीमोल्लंघन. शक्तीपूजेच्या नऊ दिवसांनंतर उद्या येणारे सीमोल्लंघन सकलांना आपल्या मर्यादित अस्तित्वाची सीमा लांघून अमर्याद आत्मशक्तीच्या वाटेकडे घेऊन जाणारे ठरो.

- श्रीपाद कोठे

१४ ऑक्टोबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा