बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

चांगला समाज

न्याय मिळवणे, त्यासाठी संघर्ष; या चांगल्याच गोष्टी आहेत. पण न्याय मिळवण्याची गरजच पडणार नाही कारण अन्यायच नसेल, असं जीवन उभं करण्याचा प्रयत्न करणं; हे अधिक चांगलं. असं जीवन उभं करण्याचे अनेक पैलू असतील आणि त्यातील पुष्कळ आपल्याशी व्यक्तिशः संबंधित असतील. पुष्कळ गोष्टी व्यक्तिशः आपल्या हातीही असतील. विश्वास निर्माण करणे, वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न, प्राधान्य आणि भर देण्याच्या गोष्टी; या आपल्याशी संबंधित असू शकतात. १०० टक्के आदर्श समाज असू शकत नाही हे खरेच, पण समाज १०० टक्के आदर्श असावा असा प्रयत्न केला तरच तो अधिक प्रमाणात चांगला होऊ शकेल. आपल्या स्वतःसकट कोणीही येतानाच सज्जनतेचं वा दुर्जनतेचं प्रमाणपत्र घेऊन येत नाही. आपण स्वतः जसं चांगलं होण्याचा प्रयत्न करतो तसाच सगळ्यांनी करावा, हीच चांगल्या समाजाच्या निर्मितीची दिशा असू शकते. आपल्या प्रयत्नांचा किमान ५० टक्के भाग यासाठीच असावा. तसं नसेल तर फार काही आशा ठेवू नये.

- श्रीपाद कोठे

६ ऑक्टोबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा