गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

पत्रकारिता

झी न्यूज के संपादक सुबीर चौधरी ने बताया कि, कल (२८ सितंबर रात को) भारत का कोई एक पत्रकार अपने मोबाईल में सेव्ह प्रधानमंत्री मोदी जी की तस्वीर दिखाकर न्युयोर्क के लोगों से पूछ रहा था- आप इन्हें पहचानते है क्या? बहुत स्वाभाविक था की न्युयोर्क में रहनेवाले अमरिकी लोग या अन्य देशों से आए लोग कहते थे- नहीं. उसका ये तमाशा कोई चैनल लाइव्ह दिखा रहा था. और ये साबित करने की कोशीश हो रही थी की- देखिये, प्रधानमंत्री मोदी जी को यहाँ कोई जानता तक नहीं. उनकी अमरिका यात्रा केवल media hype है. अब ऐसे पत्रकार और ऐसी पत्रकारिता को क्या कहेंगे? क्या ऐसे लोगों पर विश्वास किया जा सकता है? करना चाहिए? ये तो बहुत सामान्य बात है की किसी भी देश के मुखिया को अन्य देश में वहां का सामान्य नागरिक कम ही पहचानेगा. बराक ओबामा की तस्वीर कितने भारतवासी पहचान सकेंगे? इसका अर्थ यह तो नही होता की उनका कोई महत्व नही या उनकी कोई ताकत या हैसियत नही. ऐसी पत्रकारिता पर सिर्फ दया आ सकती है.

- श्रीपाद कोठे

३० सप्टेंबर २०१४

प्रेरणा माणुसकीच्या

आज दोन बातम्या पाहिल्या. एका सरदारजीने आपली पगडी सोडून, तिच्या साहाय्याने बुडणाऱ्या युवकांचे प्राण वाचवले. दुसरी बातमी- एक बिबट्या पाणी प्यायला गेला अन पाणी पिता पिता त्याचा पूर्ण चेहरा स्टीलच्या घागरीत अडकला. मोठी जोखीम घेऊन, प्रयत्नपूर्वक लोकांनी त्याला वाचवले.

निव्वळ भौतिक, आर्थिक लाभहानीच्या पलीकडच्या प्रेरणाच माणसाला माणूस बनवतात. अन मुळात त्या असतातच. त्यांचं जागरण, त्यांची चर्चा, त्यांच्यासाठी पोषक वातावरण, त्यांच्या संवर्धनाची खटपट, त्यांची जोपासना, त्यांना प्राधान्य, त्यांना उचलून धरणे; यावर अधिक भर देण्याला पर्याय नाही. असंख्य अनावश्यक गोष्टी कमी करून त्या गोष्टींकडे लक्ष दिले तर आणि कदाचित तरच, भविष्य बरं राहील. हिशेब शिकवत राहणे अन हिशेब करत राहणे बिघाडच करत राहतील.

- श्रीपाद कोठे

३० सप्टेंबर २०१५

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

बुद्ध आणि शिवाजी

परवा मोदीजी म्हणाले, 'भारताने जगाला बुद्ध दिला.' आज भिडे गुरुजींनी त्यावर आक्षेप घेतल्याची बातमी पाहिली. हे योग्यही झालं अन अयोग्यही. योग्य यासाठी की, भ. बुद्धाला अवतार वगैरे ठरवल्यानंतरही समग्र हिंदू समाजाने तसं मानलेलं नाही, हे स्पष्ट झालं. या वास्तवावर वाद घालण्यापेक्षा असं ठरवून वगैरे सगळ्यांची मान्यता मिळणे शक्य असते का, या प्रश्नाचा विचार व्हायला हवा. हे केवळ बुद्धाच्या बाबतीतच नाही तर वेद, श्रीराम, श्रीकृष्ण, येशू, पैगंबर साहेब, मार्क्स, अब्राहम लिंकन, मदर टेरेसा, न्यूटन, आइन्स्टाइन, विज्ञान, लोकशाही.... किंवा गेला बाजार अगदी श्रीपाद कोठे; यांच्या बाबतीतही लागू होतं. मुळातच असं मतैक्य वगैरे या फक्त कल्पना असतात. प्रत्यक्षात सर्वसाधारण पद्धतीने, विवेकाने, तारतम्यानेच विचार व्यवहार करावा लागतो. मतैक्य वगैरेचा आक्रस्ताळे पणा समर्थनीय म्हणता येत नाही.

दुसरा मुद्दा भिडे गुरुजींच्या प्रत्यक्ष आक्षेपाचा. भारताने जगाला बुद्ध नाही तर शिवाजी इत्यादी दिले असं त्यांचं म्हणणं. अगदी बरोबर आहे. पण शिवाजी कशासाठी? समर्थांच्या शब्दात 'उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया' यासाठी किंवा 'गो ब्राम्हण प्रतिपालना'साठीच ना? शौर्य, पराक्रम, रिपू निर्दालन या गोष्टी नाकारता येत नाहीतच, त्या योग्यच आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी अंतिम नाहीत. शौर्याला मानवी जीवनाचा आदर्श मानणारी रॉबिनहूड संकृती ही भारतीय संस्कृती नाहीच. शौर्य कोणत्या हेतूने केलेलं आहे त्यावर त्याची स्वीकार्यता किंवा अस्वीकार्यता अवलंबून असते. शौर्यासाठी शौर्य नाही तर, पूर्णतेचा जो आदर्श इथल्या माणसाने प्रस्थापित केला त्यासाठी शौर्य; हा आहे भारत. भगवान बुद्ध हे त्या पूर्णत्वाचं एक नाव आहे. शौर्यासाठी शौर्य या आदर्शानेच जगात आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, पांथिक संघर्ष जन्माला घातले, पोसले आणि सुरू ठेवले. त्यातून मार्ग काढण्यासाठीच शौर्याचा हेतू आणि अधिष्ठान सिद्ध करायला हवे. भगवान बुद्ध हे त्या हेतूचे आणि अधिष्ठानाचे एक नाव आहे. मोदीजींनी तेच जगासमोर मांडले आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, २९ सप्टेंबर २०१९

हृदयविकाराचे मूळ

आज 'हृदय दिन' आहे, 'हृदयविकार दिन' आहे; असे दोन व्हर्शन्स वाचण्यात आले. नेमकं काय माहिती नाही. पण दोन्हीऐवजी, 'हृदयस्वास्थ्य दिन' असं असावं अशी माझी सूचना. चळवळ्या कार्यकर्त्या लोकांना वाटलं तर त्यांनी यासाठी प्रयत्न करावा. ते असो. तर या दिनानिमित्त माहिती, चर्चा, मुलाखती हे सगळं शिस्तीने होईलच. ते आवश्यकही आहेच. योग्यही. या सगळ्यात आकडेवारी, वाढघट यासोबत विश्लेषणही असतं. त्यात न चुकता येणारा मुद्दा म्हणजे, ताणतणाव आणि जीवनशैली. प्रदूषण इत्यादी बाकीचे विषयही असतातच. पण मुख्य जीवनशैली. याबाबत दुमत नसतं आणि दुमत होण्याचं कारणही नाही. त्यामुळे जीवनशैली बदलायला हवी यावर भर देऊन, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा विचार केला जातो. मात्र यापलीकडे जाताना कोणी दिसत नाही. मनातील सुप्त द्वंद्व यासाठी कारण असावे. कारण जीवनशैली बदलायला हवी एवढं म्हणून उपयोगाचं नाही. या नको असलेल्या जीवनशैलीच्या मुळाशी काय आहे? ही जीवनशैली का आणि कशी विकसित झाली? ही बदलायची असेल तर मुळातून काय काय करावे लागेल? हे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचा विचार केला तर तो शोध आम्हाला घेऊन जातो, जीवनाचं तत्त्वज्ञान बदलण्याच्या गरजेपर्यंत. अन नेमकी इथेच मेख आहे. कारण आज मानवाने स्वीकारलेले संपत्ती, सत्ता, स्पर्धा, संचय, उपभोग यांचे जीवनतत्त्वज्ञान सोडण्याची आपली समाज म्हणून तयारी नाही. आजच्या स्वीकृत जीवन तत्त्वज्ञानाची ओढ आणि मोह आम्ही सोडू शकत नाही. मग मैत्री, बोलणे, व्यक्त होणे, सामूहिक उपक्रम, व्यायाम, अवकाश अशाच चौकटीत आपले उपाय फिरत राहतात. व्यवहारात फार काही बदलत नाही. बाह्यतः काहीही केलं तरी मन दुसरीकडेच घुटमळत राहतं. मुख्य म्हणजे जी जीवनशैली योग्य आहे असं बुद्धीला वाटतं ती आचरण्याचं तार्किक आणि तात्त्विक बळ आम्हाला लाभतच नाही. कारण आमच्या लोभ आणि मोहापायी जीवनाच्या सत्याला सामोरे जाण्याचेच आम्ही टाळतो. आमची स्वप्ने, शब्दावली या गोष्टी बदलायला देखील आम्ही भितो. आज धरलेलं सोडलं तर करायचं काय, यासारखे भाबडे प्रश्न मग सतावायला लागतात. अन सर्व क्षेत्रातील नेतृत्व बोटचेपेपणा करत रोखठोक बोलायला, सांगायला घाबरतं. कोणाला काय वाटेल, काय वाटेल याची इतकी प्रचंड भीती माणसांना व्यापून आहे की विचारता सोय नाही. शिवाय संतत्वाचं आणि सात्विकतेचं विचित्र भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे ते निराळंच. योग्य अयोग्य सांगताना कठोर व्हावं लागलं तरी व्हायला हवं. पण त्यासाठी कोणाची तयारी नाही. सगळ्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. हे असंच सुरू राहील की बदलेल? काळच सांगू शकेल.

- श्रीपाद कोठे

२९ सप्टेंबर २०२१

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

शास्त्रीय संगीत

सहज रिमोटची बटनं दाबत होतो. डीडी-भारती वाहिनी लागली. तिथे चक्क भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे तो राहू दिला. पूर्ण ऐकला. पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे गायन आणि राजेंद्र प्रसन्न यांचं बासरीवादन अशी जुगलबंदी सुरु होती. नव्हाळीचं म्हणून आणि गायन-वादन चांगलं होतं म्हणून ऐकत होतो, पण ऐकताना वारंवार मनात येत होतं- दुपारी एक वाजता राग ललित ऐकायचा म्हणजे थोडं जास्तंच, नाही का? राग ललित सकाळचा राग आहे. दुपारी मधुवंती, सारंग वगैरे लावावे; हे दूरदर्शनच्या लोकांना माहिती असणे कठीण आहे. शिवाय सकाळी शास्त्रीय संगीतासाठी वेळ आहे का? वगैरे तांत्रिक कारणेही असतीलच. एक मात्र खरं की, शास्त्रीय संगीताकडे होणारं दुर्लक्ष थोडं तरी कमी व्हायला हवं आणि संबंधित लोकांचं त्याबद्दलचं ज्ञान जरा वाढायला हवं.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०१४

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

विसर्जन टाकी

काल सोनेगाव तलावावर गणेश विसर्जनासाठी जाण्याचा योग आला. तिथे आवडलेली अन सगळ्यांना सांगावीशी वाटलेली गोष्ट म्हणजे विसर्जन व्यवस्था. आजकाल प्रदूषण समस्येमुळे निर्माल्य वेगळे काढणे, ते गोळा करण्याची व्यवस्था अन कृत्रिम टाक्यात गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यासाठी तेथे मोठे कलश तर आहेतच, पण विसर्जनासाठी तलावाला लागूनच एक पोहोण्याच्या टाक्यासारखे मोठे १२ फूट खोल सिमेंटचे टाकेच बांधले आहे. कृत्रिम वगैरे नाही खरेखुरे. त्यात गणेश विसर्जन करताना तलावातच विसर्जन केल्यासारखे वाटते. हा `फील' येणेही महत्वाचे असतेच. अनेक जण कृत्रिम तलावात विसर्जन करत नाहीत कारण तो `फील' येत नाही. पुण्यालाही गणेश विसर्जन करण्याचा २-४ दा योग आला. पण नदीच्या काठावर असलेल्या टाक्या फारच कृत्रिम वाटतात. डबक्यासारख्या. गणपती पाण्यात बुडवणे असाच `फील' तेथे आला. पण सोनेगाव तलावावरील आटोपशीर टाके गणेश विसर्जन केल्याचे समाधानही देते. सगळीकडे अशी व्यवस्था झाली तर लोकांचा प्रतिसादही चांगला मिळू शकेल.

- श्रीपाद कोठे

२६ सप्टेंबर २०१५

संस्कृत

जगभरातील ९७ टक्के भाषा संस्कृतने प्रभावित आहेत असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटल्याची माहिती वाचायला मिळाली. संस्कृत शब्दकोशात सर्वाधिक म्हणजे १ अब्ज ७८ कोटी ५० लाख शब्द आहेत. जगातील कोणत्याही भाषेत एवढी शब्दसंख्या नाही. संस्कृत ही सगळ्यात स्पष्ट बोलली जाणारी भाषा असून जिभेचे सगळे स्नायू त्यासाठी उपयोगात आणले जातात. कठीणातले कठीण उच्चार संस्कृतच्या सरावाने शक्य होतात. सहाव्या सातव्या पिढीच्या संगणकाचा आधार संस्कृत भाषा राहील.

एवढी सगळी माहिती कानी पडल्यावर मनात म्हटलं- शिक्षण क्षेत्राचंच नव्हे तर सगळ्या समाजाचंच अधिकाधिक भगवीकरण होवो. शेवटी `करण' कोणत्या रंगाचं आहे यापेक्षा समाजाचं, जगाचं भलं होणं जास्त महत्वाचं नाही का? संयुक्त राष्ट्रसंघाला अन जगाला भगवीकरणाचं वावडं नाही हे किती चांगलं आहे नाही.

- श्रीपाद कोठे

२६ सप्टेंबर २०१५