काल सोनेगाव तलावावर गणेश विसर्जनासाठी जाण्याचा योग आला. तिथे आवडलेली अन सगळ्यांना सांगावीशी वाटलेली गोष्ट म्हणजे विसर्जन व्यवस्था. आजकाल प्रदूषण समस्येमुळे निर्माल्य वेगळे काढणे, ते गोळा करण्याची व्यवस्था अन कृत्रिम टाक्यात गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यासाठी तेथे मोठे कलश तर आहेतच, पण विसर्जनासाठी तलावाला लागूनच एक पोहोण्याच्या टाक्यासारखे मोठे १२ फूट खोल सिमेंटचे टाकेच बांधले आहे. कृत्रिम वगैरे नाही खरेखुरे. त्यात गणेश विसर्जन करताना तलावातच विसर्जन केल्यासारखे वाटते. हा `फील' येणेही महत्वाचे असतेच. अनेक जण कृत्रिम तलावात विसर्जन करत नाहीत कारण तो `फील' येत नाही. पुण्यालाही गणेश विसर्जन करण्याचा २-४ दा योग आला. पण नदीच्या काठावर असलेल्या टाक्या फारच कृत्रिम वाटतात. डबक्यासारख्या. गणपती पाण्यात बुडवणे असाच `फील' तेथे आला. पण सोनेगाव तलावावरील आटोपशीर टाके गणेश विसर्जन केल्याचे समाधानही देते. सगळीकडे अशी व्यवस्था झाली तर लोकांचा प्रतिसादही चांगला मिळू शकेल.
- श्रीपाद कोठे
२६ सप्टेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा