मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

शास्त्र आणि भाव

ॐ नम: शिवाय

आज श्रावणातला शेवटला सोमवार. शास्त्रापेक्षा भाव मोठा असतो हे सांगणारं हे छायाचित्र. शास्त्र सांगतं- शिवाला पांढरं फुल वाहा. भाव जास्वंदीचं लाल फुल वाहतो. अन भगवान ते स्वीकारतातही. शास्त्र पद्धती सांगतं. भाव म्हणतो- `पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति'. या भावाचं आकलन झालं की, श्रावण सोमवारची खुलभर दुधाची कहाणी समजते. मग, सगळेच लोक ट्राफिक सिग्नल तोडतात मीच का पाळू? हा प्रश्न विरघळून जातो. अन मनातला मूर्तिकार जागा होऊन दगडातील मूर्ती, अन मूर्तीतील ईश्वर दिसू लागतो. तो मूर्तीत असूनही चराचर विश्वाच्या कणाकणात असतो. चांगल्यात अन वाईटातही असतो. माझ्यात अन तुझ्यातही असतो. उजेडात अन अंधारातही असतो. सगळंच त्याचं असतं, अन सगळं तोच असतो. शास्त्र जागं असेल तोवर दगडच दिसतात. दगडातील मूर्ती अन मूर्तीतील ईश्वर नाही दिसत. शास्त्र `मी'ला चालवतं, भाव `मी' घेऊन जातो. म्हणून शास्त्र आवडतं, पटतं, समजतं. भाव आवडत नाही, पटत नाही, समजत नाही. पण भाव जागल्याशिवाय अभाव मात्र दूर होत नाही.

- श्रीपाद कोठे

७ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा