रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

माणूस आणि गुन्हेगार

तिहार कारागृहावर एक कार्यक्रम पाहिला. तेथील अव्यवस्था, कारागृहातील गुंडगिरी, त्या कारागृहाचा इतिहास, किरण बेदी यांनी त्या तिहारच्या अधिकारी असताना सुरु केलेले कैद्यांच्या सुधारणेचे प्रयत्न इत्यादी. मन सहज १०-१२ वर्षापूर्वीच्या प्रसंगात पोहोचलं. १०-१२ वर्षांपूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. मुळात कारागृहात जाण्याची (कार्यक्रमाला का होईना !!) पहिलीच वेळ. त्याआधी एकदा एका लेखासंबंधी कारागृह अधीक्षकांना भेटायला कारागृहात त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं झालं होतं. शिवाय अगदी शाळेत असताना इंदिरा गांधींच्या कृपेने लावण्यात आलेल्या आणीबाणीत कारागृहात असलेल्या मामांना भेटायला आईसोबत गेलो होतो. पण गुन्हेगार कैद्यांची भेट, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे; याची पहिलीच वेळ होती. शिवाय त्यांच्यासमोर भाषण काय करायचे असाही मनात प्रश्न होता. परंतु कार्यक्रम छान झाला. समोर बसलेल्या कैद्यांच्या डोक्यावरील टोप्या आणि त्यांचे वेश बदलून त्यांना सर्वसामान्य कपडे दिले असते तर समोर कैदी बसले आहेत असेही जाणवले नसते. समोर नीट रांगेत बसलेले कैदी, मंचावर अन्य कार्यक्रमांप्रमाणेच व्यवस्था, सुरुवातीला पूजन, दीपप्रज्वलन वगैरे रीतसर. नंतर भाषण. आभार प्रदर्शन. सगळा कार्यक्रम पार पडला. पुष्पगुच्छ देणे, आभार प्रदर्शन ही कामे कैद्यांनीच केली. आभार प्रदर्शन ऐकताना मात्र सगळेच चाट पडले होते. भाषा, शुद्ध उच्चार, मंचावरून बोलण्याचा सराव, आत्मविश्वास त्यात वापरलेल्या ओळी आणि मुद्देही; कोणालाही आश्चर्यात टाकतील असेच. स्वाभाविकच कार्यक्रमानंतर विचारपूस केली. तेव्हा कानावर विश्वासच बसेना. ज्या व्यक्तीने आभार प्रदर्शन केले होते ती व्यक्ती आळंदीची होती. ज्ञानेश्वरीवर प्रवचने देत होती आणि एका खुनाच्या आरोपाखाली नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होती. फार तपशील कळला नाही. पण हेही कळले की, कारागृहात असे काही कार्यक्रम असले की आभार प्रदर्शन वगैरे त्याच्याकडेच राहत असे. अतिशय मनमिळावू आणि समंजस. छोट्या छोट्या गोष्टीत अन्य कैद्यांचा मार्गदर्शक. समेट घडवून आणणे वगैरे त्याचेच काम. त्याने खरंच खून केला असेल? केला असेल तर का? ज्ञानेश्वरीचा उपासक एवढा तोल गमावू शकतो? अशी काय परिस्थिती असेल? माणूस आणि गुन्हेगार यात काय फरक असतो? माणसाचा गुन्हेगार का होतो? कोणाचा आणि किती दोष? या गोष्टी अपरिहार्य आहेत?

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा