आज स्मृतिभ्रंश दिवस देखील आहे. स्मृतिभ्रंश हा आजार म्हणून जाहीर केलेला आहे हे मात्र फारसे पचत नाही. पश्चिमेचा जो एकांतिक व्यक्तिवादी विचार आहे, त्याचा हा परिणाम आहे. हा व्यक्तिवाद माणसाला निसर्गचक्रातून वेगळे काढून विचार करतो. सोबतच मानवी श्रेष्ठत्वाचे पोवाडे गातो. त्यामुळेच मानवी शरीराचा विकास त्याला मान्य आहे पण मानवी शरीराचा ऱ्हास तो विचार स्वीकारू शकत नाही. मानवी शरीराचा ऱ्हास हा त्याच्या दृष्टीने चुकीचा ठरतो. मानवी शरीर कायम तसेच राहावे आणि त्याच्या शक्ती सतत वाढत जाव्या, असा काहीसा अट्टाहास तो विचार करतो. मानवी जीवनाच्या विकासाइतकाच त्याचा ऱ्हास स्वाभाविक आहे हे मान्य करणे त्याला अवघड जाते. मानवाचे श्रेष्ठत्व आणि अमरत्व भारतीय चिंतनानेही मान्य केले आहे. परंतु हे श्रेष्ठत्व आणि अमरत्व पाच-सहा फुटी शरीराचे, त्यातील सदा चंचल मनाचे किंवा अपूर्ण बुद्धीचे नाही. तर त्याहून व्यापक, त्या पलीकडील अनिर्वचनीय अशा अस्तित्वाचे श्रेष्ठत्व आणि अमरत्व आहे. मानवी मापांनी मोजणाऱ्या पश्चिमेच्या विचारांना सध्या तरी त्याचे आकलन झालेले नाही. त्यामुळेच तो विचार हट्टी आणि आग्रही होतो. अन स्मृतीभ्रंश स्वाभाविक म्हणून स्वीकारू शकत नाही.
- श्रीपाद कोठे
२० सप्टेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा