मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

हिंदी

आज सकाळी मी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कारण ती छान भाषा आहे. मला आवडते आणि थोडीफार येतेही. सोबतच ती तुलसी, मीरा, प्रेमचंद, दुष्यंतकुमार, निराला आदींचीही भाषा आहे. या भाषेतील अनेकानेक गाण्यांनी करोडो लोकांच्या भावविश्वाला आकार दिला आहे. पण संध्याकाळ होता होता या सगळ्या विचारावर एक विशादाची सावली पडली. बातम्यांमध्ये ऐकण्यात आलं की, देशाची एक भाषा असावी, असं मत गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील कार्यक्रमात व्यक्त केलं. आश्चर्य वाटलं आणि दु:खही झालं. त्यांनी असं मत मांडलं असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही होऊ शकत. फेसबुकवर सुद्धा या विषयाची चर्चा सुरू झालेली दिसली. One nation, one language. या पोस्टवर तर त्यापुढे जाऊन one religion असंही मत व्यक्त झालं आहे. समाज माध्यमात आणि समाजात अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच आहे. एकता, ऐक्य अथवा एकत्व म्हणजे एकरूपता हेच गेल्या शे दोनशे वर्षात आमच्या कानीकपाळी सांगितलं गेलं. त्याचा हा परिणाम आहे. परंतु प्रश्न हा आहे की उच्चपदस्थ आणि देशाचे कर्तेधर्ते यांनीही असाच विचार करावा? अनेकतेत एकता. विविधतेत एकता. हा विचार आणि तशी माणसांची आणि समाजाची घडण हीच तर भारताची जगाला देणगी आहे. एवढेच नाही तर आज जग त्यासाठी आसुसलं आहे. अशा वेळी आम्ही मात्र आमच्या प्रकृतीशी न जुळणारा मार्ग धरणार आहोत का? त्याहून महत्वाचा प्रश्न आहे, भारतावर अभारतीयत्व लादले जाणार आहे का? का लादले जावे? भाषेच्या संबंधाने गोळवलकर गुरुजींनी केलेले एक मतप्रदर्शन आठवते. ते म्हणाले होते - भारताच्या सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. केवळ त्यांनी म्हटले म्हणून तसा विचार करावा असे नाही. माणूस, मानवी सभ्यता आणि मानवी जीवन या व्यापक संदर्भात सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. तसे न होता आपण अधिकाधिक लघु होतो आहोत का हा मूळ प्रश्न आहे.

- श्रीपाद कोठे

१४ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा