विचारीपण आणि सहिष्णुता या एकच गोष्टी आहेत का? मला तसे वाटत नाही. माणूस विचारी असेल तरी सहिष्णू असेलच असे नाही, अन माणूस सहिष्णू असेल तरी विचारी असेलच असेही नाही. एखाद्याचे विचार अगदी छान असतील, बरोबरही असतील; पण तो सहिष्णू नसू शकतो. आपण करतो तसाच विचार सगळ्यांनी करायला हवा अशी त्याची अपेक्षा असते. किंवा आपण करतो तोच विचार योग्य, सर्वोत्तम वगैरे आहे असा त्याचा दावा असतो. किंवा आपण इतका चांगला विचार करीत असूनही बाकीचे तसा विचार का करीत नाहीत यावरून तो त्रागा करीत असतो. मग वागण्यात- बोलण्यात- लिहिण्यात- व्यक्त होण्यात- अव्यक्त राहण्यात- हा त्रागा प्रकट होतो. अनेकदा यापायी मतभेदांचे मनभेदात रुपांतर होते. कधी आग्रही स्वभावासाठी अहंकार कारण असतो, तर कधी आपल्या विचारांचा- बुद्धिमत्तेचा दंभ. हळूहळू तर अन्य विचारातील योग्य अयोग्यता पाहण्याची, तपासण्याची सुद्धा गरज अशांना वाटत नाही. या जगात काय ते आपणच, अशी ही वृत्ती. वास्तविक सर्वंकष विचारांपासून आपण दूर जातो आहोत याचे भानही मग उरत नाही. आपण या पृथ्वीवर येण्यापूर्वीही जग चालत होतं अन आपण राम म्हटल्यावरही जग चालणार आहे याचं अवधान निसटून जातं. दूध आणि पाण्याच्या मिश्रणातील दूध वेचून घेण्याची हंसवृत्ती मग लोप पावते. मग आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याचा उपहास, उपेक्षा, टिंगलटवाळी, कुचेष्टा करण्याचा प्रयत्न सुरु होतो. आजकाल ही वृत्ती वाढल्यासारखी वाटतेय.
- श्रीपाद कोठे
१६ सप्टेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा