आज गप्पांमध्ये एक मुद्दा आला विम्याचा. आजकाल सगळ्या गोष्टींचा विमा आहे. मुळात विमा काय आहे. मला त्याचा इतिहास ठाऊक नाही पण विमा ही सामाजिक जाणिवेतून आलेली व्यवस्था असावी असा माझा तर्क आहे. म्हणजे अनेकांनी थोडं थोडं जमा करायचं आणि ज्याला गरज पडते त्याला कमी/ जास्त मदत द्यायची. प्रत्येकाला मदत लागेलच असं नाही. तरीही सगळ्यांनी contribute करायचं. हे मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी त्याला व्यवसायाचं रूप मिळालं. परंतु हळूहळू अन्य सगळ्याच क्षेत्रात जसं, वृत्तीचं व्यवसायात आणि व्यवसायाचं व्यभिचारात रूपांतर झालं तसंच विम्याचंही झालं. परिणामी जो विमा व्यक्तिगत निर्णयाचा भाग असायला हवा (आणि अजून काही प्रमाणात आहे) तो अपरिहार्य होऊ लागला. आरोग्य क्षेत्रात हा प्रकार वाढू लागला आहे. पुष्कळदा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी विमा आहे की नाही याची चौकशी होते. त्यातून आर्थिक चाचपणी होते. विदेशी जातानाही आरोग्य विमा महत्वाचा ठरतो. स्वयंचलित गाड्यांसाठी तर तो अपरिहार्यच करण्यात आला आहे. नुकतीच त्यासाठीची रक्कम वाढवण्यात आली आणि अलीकडे त्यासाठीचा दंड वाढवण्यात आला. खरं तर विमा ही ऐच्छिक बाब असायला हवी. त्याचा फायदा किंवा तोटा त्या त्या व्यक्तीला होईल. त्याची जबरदस्ती कशाला असावी? तो गुन्हा का ठरवण्यात यावा? इथे आठवण होते महात्मा गांधी यांची. जीवनात एका क्षणी त्यांनी काढलेली विमा पॉलिसी रद्द केली होती. का? त्यांचे म्हणणे असे की, सगळं जग ही ईश्वराची निर्मिती आहे आणि प्रत्येक जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी जर ईश्वराची तर मी काळजी का करू? सगळे लोक या स्तराचा विचार करू शकत नाहीत, त्या स्तरावर जगू शकत नाहीत हे खरे. मात्र जे त्या पातळीवर विचार करतात त्यांना त्यानुसार राहता यायला हवे की नाही?
दुर्दैवाने आज माणसाला आर्थिक प्राणी किंवा राजकीय प्राणी किंवा सामाजिक प्राणी समजून सगळा विचार केला जातो. त्यामुळे सगळ्यांना एकच मापदंड लावले जातात. परंतु माणूस असा आहे का? खरं तर माणूस कसा आहे, काय आहे हे माणसापूर्वी अस्तित्वात असलेली एखादी गोष्टच सांगू शकेल. माणूस हा माणसापूर्वी अस्तित्वात नव्हता हे मात्र निश्चित. तरीही त्यासाठी त्याने घेतलेल्या सातत्यपूर्ण ध्यासाने तो या निष्कर्षापर्यंत आला आहे की, माणूस हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या जाणीवस्तरांवर जगतो. उद्या यात आणखीनही भर पडू शकेल. आज मात्र त्याला हे चार स्तर माहिती आहेत. दुर्दैवाने आजचा सगळा विचार आत्मा हा स्तर लक्षात न घेताच केला जात असल्याने, सगळे विचार, सगळ्या व्यवस्था, सगळ्या रचना, सगळ्या पद्धती, सगळे उपाय, सगळी विश्लेषणे close ended असतात. बाहेर पडण्यासाठी, नकार देण्यासाठी, बाजूला होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी; जो openness हवा तोच हरवला आहे. Open ended विचार केला तर अराजक निर्माण होण्याची भीती, हा सुद्धा आत्मा या स्तराचा विचार न करण्याचाच परिणाम आहे. स्वामी विवेकानंदांनी या संदर्भात काही संकेत वेळोवेळी दिले होते. मूलभूत विचारांचा जागर केल्याविना वर्तमान भुलभुलैय्यातून मार्ग निघणे दुरापास्त आहे हे मात्र खरे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १५ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा