गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

अर्थहीन

पुन्हा एकदा अर्थहीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी आणि मोहनजी भागवत अशी काहीतरी तुलना करून पोरकट चर्चा सुरू केली. मग महिलांचा आदर करण्यात कोण आघाडीवर याचा वाद सुरू झाला. एक फोटो पाहण्यात आला - काही मुली मोहनजींचे पाय धुवत आहेत असा अन दुसरा मुलींशी हस्तांदोलन करतानाचा. अन टिप्पणी होती आम्ही स्त्रियांना बरोबरीने वागवतो. म्हणजे भागवत आणि त्यांचे अनुयायी स्त्रियांना बरोबरीने वागवत नाहीत. वास्तविक या वादात बोलण्याचं कारण नाही. राजकारण चुलीत जाऊन त्याचं व्हायचं ते होवो. पण खंत या गोष्टीची वाटते की या समाजाची वीण उस्कटते आहे. ज्येष्ठांचे पादप्रक्षालन हा या समाजाच्या संस्कारांचा भाग आहे. यात स्त्री पुरुष असा भेद नाही. शिवाय प्रसंग विशेषी लग्न आदी वेळेला मुलामुलींचे पाय ज्येष्ठ माणसे धुतात. या सगळ्यामागे विशिष्ट अर्थ असतो. अन तो चांगलाच असतो. आदराचा असतो. नवीन युगात कोणाला ते गैर वाटू शकेल. त्यांना तसे न वागण्याची मोकळीक आहे. तशी उदाहरणेही पाहायला मिळतातच. पण सामाजिक मान्यतांचे विकृत अर्थ लावून राजकारण करताना आपण नीच पातळीला जातो आहोत आणि समाजाच्या गाभ्याला धक्का लावतो आहोत याचं भान ठेवण्याची गरज न वाटणे हे समाजाचे दुर्दैव आहे. पाय धुण्यामागील भावार्थ विरोध करणाऱ्यांनाही माहिती असतोच पण राजकारणासाठी भूमिका घेतली जाते. त्यात जात आदी घटक मिसळतात. त्या सगळ्याला वेगवेगळे कंगोरे लाभतात आणि समाजातला काही भाग चांगल्या गोष्टींचेही विकृतीकरण करतो. अन एक नासका आंबा सगळी गाडी नासवतो तसा समाज नासवला जातो. आज तर अशी स्थिती आली आहे की पुन्हा देश गुलाम झाला तरी चालेल पण हे दळभद्री राजकारण भस्मसात होवो असे वाटायला लागते. राजकारणापायी आपण गलिच्छ समाज होतो आहोत.

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा