आज 'हृदय दिन' आहे, 'हृदयविकार दिन' आहे; असे दोन व्हर्शन्स वाचण्यात आले. नेमकं काय माहिती नाही. पण दोन्हीऐवजी, 'हृदयस्वास्थ्य दिन' असं असावं अशी माझी सूचना. चळवळ्या कार्यकर्त्या लोकांना वाटलं तर त्यांनी यासाठी प्रयत्न करावा. ते असो. तर या दिनानिमित्त माहिती, चर्चा, मुलाखती हे सगळं शिस्तीने होईलच. ते आवश्यकही आहेच. योग्यही. या सगळ्यात आकडेवारी, वाढघट यासोबत विश्लेषणही असतं. त्यात न चुकता येणारा मुद्दा म्हणजे, ताणतणाव आणि जीवनशैली. प्रदूषण इत्यादी बाकीचे विषयही असतातच. पण मुख्य जीवनशैली. याबाबत दुमत नसतं आणि दुमत होण्याचं कारणही नाही. त्यामुळे जीवनशैली बदलायला हवी यावर भर देऊन, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा विचार केला जातो. मात्र यापलीकडे जाताना कोणी दिसत नाही. मनातील सुप्त द्वंद्व यासाठी कारण असावे. कारण जीवनशैली बदलायला हवी एवढं म्हणून उपयोगाचं नाही. या नको असलेल्या जीवनशैलीच्या मुळाशी काय आहे? ही जीवनशैली का आणि कशी विकसित झाली? ही बदलायची असेल तर मुळातून काय काय करावे लागेल? हे प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचा विचार केला तर तो शोध आम्हाला घेऊन जातो, जीवनाचं तत्त्वज्ञान बदलण्याच्या गरजेपर्यंत. अन नेमकी इथेच मेख आहे. कारण आज मानवाने स्वीकारलेले संपत्ती, सत्ता, स्पर्धा, संचय, उपभोग यांचे जीवनतत्त्वज्ञान सोडण्याची आपली समाज म्हणून तयारी नाही. आजच्या स्वीकृत जीवन तत्त्वज्ञानाची ओढ आणि मोह आम्ही सोडू शकत नाही. मग मैत्री, बोलणे, व्यक्त होणे, सामूहिक उपक्रम, व्यायाम, अवकाश अशाच चौकटीत आपले उपाय फिरत राहतात. व्यवहारात फार काही बदलत नाही. बाह्यतः काहीही केलं तरी मन दुसरीकडेच घुटमळत राहतं. मुख्य म्हणजे जी जीवनशैली योग्य आहे असं बुद्धीला वाटतं ती आचरण्याचं तार्किक आणि तात्त्विक बळ आम्हाला लाभतच नाही. कारण आमच्या लोभ आणि मोहापायी जीवनाच्या सत्याला सामोरे जाण्याचेच आम्ही टाळतो. आमची स्वप्ने, शब्दावली या गोष्टी बदलायला देखील आम्ही भितो. आज धरलेलं सोडलं तर करायचं काय, यासारखे भाबडे प्रश्न मग सतावायला लागतात. अन सर्व क्षेत्रातील नेतृत्व बोटचेपेपणा करत रोखठोक बोलायला, सांगायला घाबरतं. कोणाला काय वाटेल, काय वाटेल याची इतकी प्रचंड भीती माणसांना व्यापून आहे की विचारता सोय नाही. शिवाय संतत्वाचं आणि सात्विकतेचं विचित्र भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे ते निराळंच. योग्य अयोग्य सांगताना कठोर व्हावं लागलं तरी व्हायला हवं. पण त्यासाठी कोणाची तयारी नाही. सगळ्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. हे असंच सुरू राहील की बदलेल? काळच सांगू शकेल.
- श्रीपाद कोठे
२९ सप्टेंबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा