बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

बुद्ध आणि शिवाजी

परवा मोदीजी म्हणाले, 'भारताने जगाला बुद्ध दिला.' आज भिडे गुरुजींनी त्यावर आक्षेप घेतल्याची बातमी पाहिली. हे योग्यही झालं अन अयोग्यही. योग्य यासाठी की, भ. बुद्धाला अवतार वगैरे ठरवल्यानंतरही समग्र हिंदू समाजाने तसं मानलेलं नाही, हे स्पष्ट झालं. या वास्तवावर वाद घालण्यापेक्षा असं ठरवून वगैरे सगळ्यांची मान्यता मिळणे शक्य असते का, या प्रश्नाचा विचार व्हायला हवा. हे केवळ बुद्धाच्या बाबतीतच नाही तर वेद, श्रीराम, श्रीकृष्ण, येशू, पैगंबर साहेब, मार्क्स, अब्राहम लिंकन, मदर टेरेसा, न्यूटन, आइन्स्टाइन, विज्ञान, लोकशाही.... किंवा गेला बाजार अगदी श्रीपाद कोठे; यांच्या बाबतीतही लागू होतं. मुळातच असं मतैक्य वगैरे या फक्त कल्पना असतात. प्रत्यक्षात सर्वसाधारण पद्धतीने, विवेकाने, तारतम्यानेच विचार व्यवहार करावा लागतो. मतैक्य वगैरेचा आक्रस्ताळे पणा समर्थनीय म्हणता येत नाही.

दुसरा मुद्दा भिडे गुरुजींच्या प्रत्यक्ष आक्षेपाचा. भारताने जगाला बुद्ध नाही तर शिवाजी इत्यादी दिले असं त्यांचं म्हणणं. अगदी बरोबर आहे. पण शिवाजी कशासाठी? समर्थांच्या शब्दात 'उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया' यासाठी किंवा 'गो ब्राम्हण प्रतिपालना'साठीच ना? शौर्य, पराक्रम, रिपू निर्दालन या गोष्टी नाकारता येत नाहीतच, त्या योग्यच आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी अंतिम नाहीत. शौर्याला मानवी जीवनाचा आदर्श मानणारी रॉबिनहूड संकृती ही भारतीय संस्कृती नाहीच. शौर्य कोणत्या हेतूने केलेलं आहे त्यावर त्याची स्वीकार्यता किंवा अस्वीकार्यता अवलंबून असते. शौर्यासाठी शौर्य नाही तर, पूर्णतेचा जो आदर्श इथल्या माणसाने प्रस्थापित केला त्यासाठी शौर्य; हा आहे भारत. भगवान बुद्ध हे त्या पूर्णत्वाचं एक नाव आहे. शौर्यासाठी शौर्य या आदर्शानेच जगात आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, पांथिक संघर्ष जन्माला घातले, पोसले आणि सुरू ठेवले. त्यातून मार्ग काढण्यासाठीच शौर्याचा हेतू आणि अधिष्ठान सिद्ध करायला हवे. भगवान बुद्ध हे त्या हेतूचे आणि अधिष्ठानाचे एक नाव आहे. मोदीजींनी तेच जगासमोर मांडले आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, २९ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा