पुण्याच्या दीर्घ मुक्कामानंतर परतल्यावर आवरणे, साफसफाई आदी गोष्टी म्हणजे एक कामच. त्यात अंगणात लक्ष द्यायला दोन दिवस लागले. तुळशी वृन्दावनाच्या बाजूला आळ्यात एक पाकीट पडलं होतं. सततच्या पावसाने पाणी आणि मातीने भिजलेलं, थिजलेलं. ते कचऱ्यात टाकून द्यावं म्हणून उचललं आणि स्वाभाविकच काय आहे म्हणून पाहिलं. तो होता 'विमर्ष' त्रैमासिकाचा ताजा अंक. अतिशय दर्जेदार असं हे त्रैमासिक. संपादक श्री. अरुणराव करमरकर अतिशय नियमितपणे अंक पाठवतात. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. त्यांच्या कल्पक चिंतनातून विविध विषय हाताळले जात असतात. या अंकातही असाच महत्वाचा विषय आहे. विषयावर नजर गेली आणि पाकीट टाकून देण्याचा विचारच टाकून दिला. विषय आहे - समाजरचना. संपूर्ण अंकच या विषयाला वाहिलेला. ओला झालेला तो अंक प्रथम सुकवणे आणि नंतर एकेक पान सावकाश न फाडता वेगळे करणे. मग वाचणे. तर सध्या अर्धा अंक मोकळा झालेला आहे. (ज्ञानासाठी कष्ट हवेतच ना? 😊) नरहर कुरुंदकर, श्रीधर व्यंकटेश केतकर, विवेकानंद, अरविंद, गोळवलकर गुरुजी, चाणक्य; अशा महनीय व्यक्तींचे विचार आणि समाजरचना, समाजव्यवस्था आणि समाजधारणा यांची विविध अंगाने चर्चा अंकात आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर मिळवून वाचा.
- श्रीपाद कोठे
१६ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा