दीपिका पदुकोणची good day बिस्किटांची एक जाहिरात सध्या येते आहे. आपल्याच तालात असणाऱ्या २-४ जणांना त्यांच्या तंद्रीतून बाहेर काढण्यासाठी ती प्रत्येक ठिकाणी काही क्षण रेंगाळते. त्यातलं हे रेंगाळणं फार छान आहे. अन ती एक सामाजिक टिप्पणीही आहे. जाहिरात करणाऱ्याच्या मनात सामाजिक भाष्य करावं असं नसेलही कदाचित. पण सहजपणे ते झालं आहे. आज लोकांकडे जर कशाची सगळ्यात जास्त कमतरता असेल तर ती वेळेची. त्यामुळे रेंगाळण्याला वेळ नाही, व्यायामाला वेळ नाही, वाचायला वेळ नाही, जेवायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही, भेटायला वेळ नाही, साधनेला- विचारांना- चिंतनाला- वेळ नाही... अशी भली मोठी यादी. त्यामुळे एक तर तणाव किंवा खुरटलेपण. बरं तर बरं- यात काही चूक आहे असेही वाटत नाही आणि असंच चालणार किंवा असंच चालावं याला मूक संमतीही आहे. `आपल्याला वेळ नाही' ही विचार करण्याची गोष्ट नसून फुशारकीची बाब आहे असा समज पसरला आहे. एखाद्याकडे वेळ आहे म्हणजे तो `रिकामटेकडा' अथवा निरर्थक असाच सार्वत्रिक समज. प्रत्येकाला मोकळा वेळ असलाच पाहिजे. ती एक मोठी आवश्यकता आहे. पण त्याचा फारसा विचार होत नाही. तो व्हायला मात्र हवा.
एखाद्याच्या वेळेवरील आक्रमण हाही एक मोठा विषय. तो पुन्हा कधीतरी.
- श्रीपाद कोठे
१३ सप्टेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा