गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

पेपरवाला

मध्यंतरी कोल्हापूरला जाणं झालं. तिथे अभियांत्रिकीला शिकणाऱ्या भाच्याच्या खोलीवर एक दिवस मुक्काम केला. चार-पाच मित्र मिळून दोन खोल्या घेतल्या आहेत. वरच्या मजल्यावर. मोठ्ठं घर, मोठ्ठं आवार. आंगण, झाडं वगैरे. घरमालक निवृत्त बँक कर्मचारी. साधे, मितभाषी, मनमिळावू. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो तेव्हा एक छान गोष्ट पाहता, अनुभवता आली. उठून, फ्रेश होऊन बाल्कनीत येउन उभा राहिलो. भूरभूर पाऊस पडून गेला होता. आकाश ढगाळलेलं होतं. शांत, प्रसन्न वातावरण. फाटकाजवळ प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला. तेवढ्यात वृत्तपत्र टाकणारा माणूस आला. त्याने आवाज दिला- पेपर. आत ऐकू गेलं नसावं. दोन-तीन मिनिटे वाट पाहून त्याने पुन्हा आवाज दिला- पेपर. तरीही कोणी बाहेर आलं नाही. तेव्हा त्याने आपली सायकल पुढे घेऊन स्टँडवर लावली. पेपर काढले, त्याची नीट घडी घातली आणि पडणार नाही, भिजणार नाही अशा बेताने फाटकात खोचून ठेवले. मला घरी पेपर टाकणारा पोरगा आठवला. पेपर भिजतात का, उडून जातात का, वगैरे कशाचाही विचार न करता, आवाज वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता भिरकावून देणारा. कोल्हापूरचा तो पेपरवाला तिथल्या पेपरवाल्यांचा प्रतिनिधी होता की नाही हे नाही सांगता येणार. पण तो लक्षात राहणारा आणि अनुकरणीय मात्र नक्कीच होता. त्याचं तसं वागणं फुललेल्या पारिजातकाचा परिणाम होता, लहान शहराचा स्वभाव होता की त्या व्यक्तीचा पिंड? कोणास ठाऊक.

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा