'सीएनबीसी आवाज'वर एक चर्चा झाली. कोलकाता येथे एक महिला एका हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे गेल्यावर तिने आपल्या गाडीचालकालाही जेवायला बरोबर नेले. त्यावेळी हॉटेलने त्या चालकाला आत घेण्यास मज्जाव केला. या घटनेचा निषेध करून महिलेने ती सोशल मिडीयावर टाकली. त्यावरील चर्चा. एक वकील, एक हॉटेल व्यावसायिक संघटनेचा पदाधिकारी, एक पर्यटन व्यवसायाचा प्रतिनिधी आणि सूत्रसंचालक. सगळ्यांनी अर्थातच या घटनेचा निषेध वगैरे केलाच. पण या चर्चेत हेही स्पष्ट झाले की, काही क्लब्ज इत्यादी आहेत जेथे `ड्रेस कोड' असतो. तिथली सदस्यता सुद्धा तुमची आर्थिक क्षमता पाहूनच दिली जाते. हे सगळे नियमानुसार असते आणि त्यात बेकायदेशीर काहीही नाही. तुम्ही कोणताही अन कसाही पोशाख करून तिथे जाऊ शकत नाही. अन असे क्लब्ज भरपूर आहेत.
सहज तृप्ती देसाई आठवल्या. त्यावेळी धार्मिक मठमंदिरे यांच्याबद्दल झालेल्या चर्चा आठवल्या. नुकतेच मुंबईत एका गणेश मंडळाने येणाऱ्या भक्तांच्या पोषाखासाठी काही मर्यादा निश्चित केल्याचे अन त्यावर टीकाटिप्पणी झाल्याचे आठवले.
आर्थिक आधारावर भेदभाव केला अथवा मर्यादा निश्चित केल्या तर चालतात, पण धार्मिक श्रद्धांनी काही मर्यादा निश्चित केल्या तर मात्र ते घटनेच्या विरुद्ध ठरते, असाच याचा अर्थ. आधुनिकता आणि पुरोगामित्वाचा जयजयकार असो.
- श्रीपाद कोठे
१७ सप्टेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा