गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

तमाशा कुणाच्या जीवावर?

बिग बॉस सारखे कार्यक्रम नैतिकता, संस्कृती, विचार यांच्याबरोबरच अर्थकारणावरही विपरीत परिणाम करतात. त्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांचे मानधन, त्यांच्यावर होणारा खर्च, त्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा खर्च, जाहिराती, छोट्या पडद्यावरील वेळ विकत घेण्याचा खर्च; हा सगळा कुठून होतो? 'त्याला प्रायोजक असतात', असं अगदी छान, शांत, साळसूद आणि वैध उत्तर दिले जाऊ शकतेच. पण प्रश्न हा आहे की, हा खर्च प्रायोजित करणारे तरी तो पैसा कुठून आणतात? त्यांचे उत्पादन विकूनच ना? हे उत्पादन कोण खरेदी करतात? सामान्य माणसेच ना? याचा अर्थ बिग बॉस सारख्या निरर्थक आणि घातक गोष्टींना सामान्य माणसेच मदत करतात. शिवाय हा इतर खर्च उत्पादन खर्चात जोडल्याने, उत्पादने महाग होतात. (असेच गौडबंगाल विविध करांच्या आकारणीतही पाहायला मिळते.) हे समजायला फारच कठीण आहे का? कळत असूनही आपण व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून काय करतो? अशा गोष्टींचे सामाजिक अंकेक्षण व्हावे ही किमान मागणी सुद्धा करताना कोणी दिसत नाही. एकीकडे समाज बिघडवणारे आणि दुसरीकडे पैसा वाया घालवणारे, पैशाबद्दल casual approach निर्माण करणाऱ्या या गोष्टी बंद करण्यासाठी सरकारे, राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, जनहित याचिका; काहीही करत नाहीत. आम्ही दिलेल्या करातून कल्याण योजना कशाला, असा प्रश्न विचारणारेही, आमच्या पैशातून ही थेरं कशाला, असा प्रश्न विचारत नाहीत. समाजाचे धार्मिक, नैतिक प्रबोधन करणारेही याबाबत स्पष्ट, ठाम भूमिका मांडून समाजाचे बळ वाढवत नाहीत. आपल्या विचार, व्यवहारांची क्ष किरण तपासणी केली पाहिजे; हे सांगताना कोणीही दिसत नाही. समाजाप्रति कर्तव्य, देशभक्ती, आध्यात्म; म्हणजे फक्त गोड गोड बोलणे असते का? केवळ शस्त्रसज्जता असते का? केवळ पाकिस्तान आणि चीन बद्दलचा त्वेष असते का? अशा असंख्य गोष्टी समाजात घडत असताना, सारासार विचार करायचा नसेल, सारासार विचारांसाठी व्यक्तीला आणि समाजाला प्रेरित करायचे नसेल तर; आपल्या नैतिकतेच्या, देशभक्तीच्या, अध्यात्माच्या गप्पांना काय अर्थ उरतो? अस्मिता आणि शौर्य याबरोबरच, जीवन आणि जगणेही महत्वाचे असते. गौरव आणि रक्षण जीवनाचेच करायचे असते. मातीच्या तुकड्याचे आणि झुंडीचे नाही.

(आगामी लेखनातून)

- श्रीपाद कोठे

१६ सप्टेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा