रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

व्यवहाराचा आधार

गणरायाचे आगमन आणि वास्तव्य शांततेत पार पडले आणि सर्वोच्च न्यायालयाने बरोब्बर मुहूर्त साधल्याने विसर्जन दणाणून जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जो काही भाग बातमीत प्रकाशित झाला त्यावरून असं वाटतं की, त्यात थोडासा वैतागाचा भागही आहे. वैताग बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरायला हवा होता असे वाटते. खरं तर प्रत्येक गोष्टीला न्यायाच्या फुटपट्ट्या, कायद्याची चौकट, मानकीकरण (standardization) यामुळे मानवी जगणं गुंतागुंतीचं अन त्रासदायक होतं. पण करणार काय? कारण आज तर प्रत्येकाचं `वाटणं' एवढाच एक महत्वाचा मुद्दा असतो. प्रत्येकाचं `वाटणं', प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाचं मन; हे सर्वोच्च झाल्याने; कोट्यवधी मने, कोट्यवधी इच्छा, कोट्यवधी मते; यांचा संघर्ष अपरिहार्य ठरतो. मग न्याय, कायदा, मानक हे पुढे येते. तरीही मार्ग निघत नाहीच. ज्याचे ग्रह साथ देतात तो नाचतो, ज्याचे ग्रह साथ देत नाहीत तो रडतो, कुढतो, वैतागतो. मात्र प्रत्येकाचं `मन', `मत', `इच्छा' एवढ्याच आधारे विचार करणे बरोबर नाही असे मात्र कोणी म्हणताना दिसत नाही. `मन', `मत', `इच्छा' चुकीचे नक्कीच नाहीत. पण आज त्या सगळ्याला एवढी sanctity देण्यात येते की, त्यावर साधकबाधक चर्चा होण्याची गरजच वाटत नाही. `मन', `मत', `इच्छा' यावर चालण्यापेक्षा, यानुसार जगण्यापेक्षा; साधकबाधक विचार करून चालावं, जगावं ही भूमिका पुढे यायला हवी. `आनंद' याच गोष्टीचं उदाहरण घेऊ. आनंद म्हणजे काय? आनंद कसा व्यक्त करावा? या प्रश्नांना प्रत्येकाचे `मत' हे उत्तर नाही होऊ शकत. `मत' असावं, पण त्याची सगळ्या अंगाने चिकित्सा होत राहावी आणि त्या चिकित्सेतून जे योग्य असेल ते बाणवण्याची वृत्ती असावी. माझे मत, प्रत्येकाचे मत; अशा भाषेपेक्षा आणि अशा भावनेपेक्षा; साधकबाधक विचार आणि विवेक, अशी भाषा उपयोगात यायला हवी. आनंद किंवा कला आणि त्यांची अभिव्यक्ती; यांची समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, आरोग्यशास्त्रीय अशा विविध अंगांनी चर्चा होत राहायला हवी. तिची दुराग्रही नको, पण आग्रही मांडणी; हा समाजाचा मुख्य प्रवाह व्हायला हवा. ज्येष्ठ नागरिकांच्या द्वारे असा प्रवाह अगदी कालपर्यंत वाहत होता. आता ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवाहपतितासारखेच जगायचे वागायचे असते. बाकीच्यांचे काय बोलणार? केवळ अभ्यासापुरती, पुस्तकांपुरती, विद्वानांच्या चर्चेपुरती, पीएचडीच्या प्रबंधापुरती चिकित्सा करायची आणि समाजाचा आणि व्यक्तीचा व्यवहार `ज्याचे त्याचे वाटणे' असाच चालू द्यावा; हे योग्य नाही. एका मानसोपचार तज्ञानेच आत्महत्या केल्याची कालची ठाण्याची बातमी अभ्यास, व्यवहार आणि व्यक्तिवाद यांचा एकत्रित विचार किती आवश्यक आहे यावर झगझगीत प्रकाश टाकणारी आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ५ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा