शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

`महानगरे' - एक मानसिक रोग

ऑलिम्पिक गाजवणारी पी.व्ही. सिंधू badminton academy सुरु करणार अशी बातमी ऐकली. छान वाटलं. आपल्याच पदकात रममाण न होता, खेळासाठी, देशासाठी काही करणार हे अभिनंदनीयच आहे. पण बातमीचा पुढचा भाग ऐकून मात्र जरा निराशा झाली. कारण प्रस्तावित academy ती दिल्लीत काढणार आहे. अर्थात यात सिंधूची चूक नाही. academy काढायची म्हणजे जागा अन अन्य मदत आलीच. त्यात सिंधू ऑलिम्पिक रजतपदक विजेती. त्यामुळे जागा व अन्य मदत ज्यांच्या हाती असते त्या राजकारण्यांनी दिल्लीची निवड करणे स्वाभाविकच. किंबहुना त्यासाठी आग्रह धरणे, मन वळवणे असेही प्रकार झालेले असू शकतात.

फारच विचित्र दिवस आलेले आहेत. सगळं काही एकाच पोत्यात कोंबण्याचा प्रयत्न होतो. पूर्वी राजेरजवाडे, सरदार, एवढेच नव्हे उद्योजक किंवा अन्य कर्तृत्ववान लोकही नगरं, शहरं नव्याने वसवीत असत. त्यामुळे अनेक शहरं राजधानीची होती असं इतिहासात वाचायला मिळतं. शहरं भरभराटीला येत अन त्यांना उतरती कळाही लागे. आता `महानगरे' हा एक मानसिक रोग झाला आहे. शासन, प्रशासन, सरकार, नेते, उद्योजक, हेच काय, लोकांना सुद्धा महानगर म्हणजे खूप काही तरी वाटू लागलं आहे. अगदी नागपूरसारख्या ३०-३५ लाख लोकसंख्येच्या शहराचाही उल्लेख टीव्ही मालिकांमध्ये गाव असा केला जातो. कारण ते संवाद लिहिणाऱ्याची मानसिकता विकृत आहे. एक-दीड कोटीच्या मुंबईत राहणे म्हणजे आधुनिकता, पुढारलेपण, काळासोबत चालणे, विकास इत्यादी महामूर्ख कल्पना डोक्यात कोंबूनच तो जगत असतो. त्या महानगराचे हजार प्रश्न असतील, त्याचा जगण्यावर, जीवनावर मोठा विपरीत प्रभाव होत असेल तरीही तिथल्या त्रासाचाच गौरव करण्याची, त्यालाच पुरुषार्थ ठरवण्याची एक विकृती समाजात शिरली आहे. राजकारणी, संपत्तीपूजक, सत्ताकांक्षी लोक, गुंड प्रवृत्ती यांना हे सोयीचे आहे आणि हीच विकृती कायम राहावी, वाढावी अशी त्यांची इच्छा आणि प्रयत्न आहेत. जागतिकीकरण, आधुनिकता, विकास, चांगले राहणीमान इत्यादी गोंडस नावांखाली हे सगळे चालते. प्रश्न आणि समस्या यांनाच जन्माला घालणारी ही विकृती कायम ठेवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न वगैरे निरर्थक आहे.

आधुनिक जीवनशैली स्वीकारूनही समस्यांच्या जंजाळातून बाहेर पडायचे असेल, अन चांगल्या जीवनशैली सोबतच जीवनाची सार्थकता हवी असेल तर शहरांचा आकार या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक कल्पना सार्वजनिक चर्चेसाठी मांडतो. आजच्या किमान ५० टक्के समस्याच उरणार नाहीत अशी ही कल्पना आहे. कल्पना अशी- १० लाख लोकसंख्येची २ हजार नगरराज्ये विकसित करावी. आपण ज्या ग्रीस, रोम इत्यादीची खूप चर्चा करतो ती नगरराज्येच होती हे लक्षात घ्यावे. आपल्या देशातही अशी अनेक नगरराज्ये होती. आजच्या सुमारे अडीच डझन राज्यांच्या ऐवजी दोन हजार राज्ये. एका केंद्रीय सत्तेअंतर्गत ही राज्ये राहतील. म्हणजे दोन हजार लोकांना मुख्यमंत्री होता येईल. हजारो लोकांचं मंत्रीपदाचं स्वप्नही पूर्ण होईल. मुख्य म्हणजे ही मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण होऊ शकतील आणि असंख्य समस्या निकाली काढता येतील. सुटसुटीत आणि आटोपशीर कारभारामुळे, निर्माण होणारे प्रश्न आणि समस्या सोडवणे सोपे होईल.

अर्थात यासाठी काही गोष्टींची पूर्वतयारी हवी.

१) लोकांची मानसिकता.

२) आपल्या हातातील सत्ता सोडण्याची आजच्या सत्ताधारी लोकांची तयारी.

३) सहकार्याचे वातावरण.

४) देशांतर्गत आणि बाह्य दडपण झुगारण्याची जिगर.

५) वेगळी जीवनदृष्टी आणि विचारशीलता.

या सगळ्याचा आधार अर्थात समाज म्हणजेच सामान्य माणूस आहे. तो याबाबत विचार करणार नाही तोवर काहीही होणार नाही अन त्याने गांभीर्याने विचार केला तर कोणीही हे होण्यात अडथळे आणू शकणार नाही. म्हणूनच तुमच्या- माझ्या विचारांसाठी ही कल्पना.

- श्रीपाद कोठे 

३ सप्टेंबर २०१६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा