शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

खुलभर दुधाची कहाणी

महाकालेश्वराला शुद्ध दुधाचा अभिषेक करावा आणि त्यासाठी संबंधितांनी व्यवस्था करावी, असा आदेश न्यायालयाने दिल्याची एक बातमी वाचण्यात आली.

अन मनात खुलभर दुधाची कहाणी आठवली. श्रावणामध्ये घरोघरी वाचल्या जाणाऱ्या या कहाण्या. आता नसल्या तरी पूर्वीच्या काळी त्या वाचल्या जात असत. त्यातलीच एक खुलभर दुधाची कहाणी. राजा आज्ञा सोडतो मंदिराचा गाभारा दुधाने पूर्ण भरायचा आहे त्यासाठी सगळ्या नागरिकांनी शिवाला सोमवारी दुधाचा अभिषेक करावा. लोक अभिषेक करतात पण गाभारा भरत नाही. एक म्हातारी आपल्या घरचे सगळे आटोपून शेवटी एका छोट्याशा वाटीमध्ये दूध घेऊन जाते आणि तिने ते वाटीभर दूध टाकताच तो मंदिराचा गाभारा पूर्ण भरून जातो. शिपाई हे वर्तमान राजाला सांगतात आणि शेवटच्या सोमवारी राजा पाहायला येतो. त्यालाही तोच प्रकार दिसतो. त्या वेळेला तो त्या म्हातारीला थांबवून विचारतो की हा चमत्कार कसा काय?

म्हातारी उत्तर देते - 'कोणाला दुखवू नये. कोणाला उपाशी ठेवू नये. गाई वासरांच्या तोंडचं दूध काढून घेऊ नये. दिखावा करू नये. आपल्याला शक्य असेल तशी, श्रद्धाभावाने पूजा करावी. त्याने देव संतुष्ट होतो.'

ही केवळ गोष्ट नाही. हा भारतीय ethos आहे. माणूस, समाज यांच्या घडणीची; त्यांच्या सुव्यवस्थित धारणेची ही भागीरथी आहे. आज या भागीरथीकडे दुर्लक्ष करीत, ज्यांनी शे पाचशे वर्षे सुव्यवस्थित समाज उभा केला नाही; त्यांनी सांगितलेलं शहाणपण घेऊन आम्ही चालतो आहोत. असो.

- श्रीपाद कोठे

३ सप्टेंबर २०२०





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा