सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

मानवी hardware कडून, मानवी software कडे

भारतीय राज्यघटनेचे `कलम ३७७' आज चर्चेचा मोठा विषय आहे. अपवाद वगळता फारशी सार्थक चर्चा दिसली नाही. `संस्कृतीवर आघात' आणि `संस्कृतीवाद्यांना चपराक' हे दोन्हीही बुद्धीची मर्यादा अधोरेखित करणारे. सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण आदर करूनही, त्यांचे काही शेरे विनाकारण म्हणावे असे. १५८ वर्षे जुने हे कलम रद्द केले याचा अर्थ त्यापूर्वी समलिंगी व्यक्तींना गुन्हेगार समजले जात नव्हते. त्याचा दुसरा अर्थ समाजात अन्य लोकांसारखेच ते होते. त्यामुळे त्यावर अश्रू ढाळणे किंवा `जितं मया' हे दोन्ही बरोबर नाही. अन सगळा प्रश्न मुळात हाच आहे. इंग्रजी विचार आणि व्यवस्थांनी व्यक्ती आणि समाज यांच्या ज्या धारणा इथे रुजवल्या त्याचा हा परिणाम आहे. समाज म्हणजे काय? तर सरकार. सरकारने ठरवायचे आणि सगळ्यांनी आपले सगळे जीवन त्याप्रमाणे जगायचे. त्यापेक्षा वेगळे काही असेल तर तो गुन्हा. व्यक्तीचे बरेवाईट, व्यक्तीचे जगणे सगळे सरकारच्या अधीन. दुसरीकडे व्यक्ती म्हणजे काय? फक्त मी मी आणि मी. मला जसे वाटेल तसे वागण्याचा, जगण्याचा मला पूर्ण अधिकार आणि त्या जगण्या वागण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला पाहिजे. ते अगदी अधिकृतपणे मान्य केले पाहिजे. त्यावर मोहोर उमटवली गेली पाहिजे. ही जी मानवी अस्तित्वाची सुप्त सत्ताकांक्षा आहे तीच सत्तावाद आणि व्यक्तिवाद यातून डोकावत राहते. या दोन्हीच्या सत्ताकांक्षेतून वारंवार संघर्षाची स्थिती निर्माण होते. तीच आजही झालेली पाहायला मिळते. मुळातच व्यक्तीचे व्यक्तित्व किंवा सत्तेची शक्ती या दोन्हीही जीवनप्रवाहाच्या अवस्था आहेत, हे लक्षात घेतले जात नाही. भारतेतर विचारांची अपूर्णता आणि खंडित पद्धत यांचा हा परिणाम आहे. मानवाला ज्ञात असलेले आजवरचे सारेच विभ्रम आणि अजून ज्ञात नसलेले किंवा नवनवोन्मेषशालिनी सृष्टीच्या कालगर्भातून प्रत्यक्षात येऊ शकणारे सारेच विभ्रम; यांना भारतीय विचार मान्यता देतो. अगदी ठाऊक नसलेल्या आणि कल्पना करू शकणार नाही अशाही गोष्टींना. कारण या सृष्टीची चक्र आपल्या हाती नाहीत हे त्याचे स्वच्छ आणि प्रामाणिक मत आहे. मात्र त्याच वेळी आमचे अस्तित्व ही केवळ एक अवस्था आहे त्यामुळे त्यावर आमची मालकी नाही. आमचे अमुक एक स्वरूप घट्ट धरून ठेवणे वेडेपणा होय, हेही भारतीय चिंतन सांगते. आम्ही जन्माला आलो तेच परिपूर्ण आहोत किंवा आम्ही जन्माला आलो तसेच राहू, हे दोन्ही विचार सुद्धा केवळ आडमुठेपणा आहेत. स्वत:च स्वत:ला नाकारणे आणि संकुचित करणे होय. आमच्या वृत्ती, रुची, इच्छा, गरजा, यांचे महत्व आहेच, पण त्याचवेळी तो काही पूर्णविराम नाही. हे मूळ सूत्र व्यवधानातून सुटलं की समस्या आणि संघर्ष होतात. आज विद्यमान विचारात आणि व्यवस्थात हे सूत्र पूर्ण लोपल्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक घटक कुरघोडी करायला पाहतो. कुरघोडीचे एक स्वरूप प्रत्यक्ष दाबण्याचे असते, तर दुसरे स्वरूप सिद्ध करणे किंवा माघार घ्यायला लावणे असे असते. समलिंगी संबंधांना जगभरात अन्यत्र कशी आणि केव्हा मान्यता मिळाली हे पाहिले तर भारतीय समाजाची प्रगल्भता उठावदार होते. याच्याही मुळाशी विचारांची व्यापकता हेच कारण आहे. लैंगिक orientation ही स्वाभाविक बाब असली तरीही त्यातील कोणतेही orientation ही फार मोठी बाब नाही. एवढेच नाही तर त्याने माणूस सुखी वा दु:खी होत नाही. ते म्हणजे पूर्णता नाही. ती समाधानाची हमी नाही. खाणे पिणे चालणे फिरणे अशा असंख्य क्रियांपैकी ती एक क्रिया आहे. त्याचा गवगवा किंवा त्यात अडकून पडणे हा काही शहाणपणा नाही. बाकी राहिले दोन मुद्दे - एक समाजाची धारणा. ज्याशिवाय घोर व्यक्तिवादी सुद्धा एखादा दिवस सुद्धा जगू शकणार नाही. त्या समाजधारणेचा साधकबाधक विचार करावाच लागतो. केलाच पाहिजे. त्याबाबत उगाचच आव्हानात्मक भाषा ही बुद्धीशून्यता आहे. दुसरा मुद्दा व्यक्तिगत मान/ अपमान, प्रतिष्ठा/ अप्रतिष्ठा यांचा. हे मानापमान प्रकरण मुदलातच बरेचसे सापेक्ष असते. त्यास समाज वगैरे रंग देणे किंवा प्रत्येक वेळी उठसूठ सरकार, न्यायपालिका किंवा तत्सम यंत्रणांना भरीस घालणे हा बावळटपणा आहे. त्याचा काही अंश व्यक्तीच्या विकासाला साहाय्यकच असतो आणि त्यातील अतिरेक केवळ मानवी जाणिवांच्या प्रगल्भतेने कमी होऊ शकतो. रडक्या मुलाप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी व्यवस्थेकडे `पाहा हा आम्हाला चिडवतो' असा गळा काढणे निरर्थक आहे. त्याबाबतीत समलैंगिकच काय अगदी सामान्य असलेल्या, परंतु लैंगिकतेपासून ठरवून वा परिस्थितीवश दूर राहिलेल्या; महिलाच नव्हे तर पुरुषांनाही मस्करी आणि टोमणे सहन करावे लागतातच. अशी मस्करी वा टोमणे मारणारे पुरुषही असतात आणि महिलाही. मात्र विचार, समज आणि जाणीवा परिपक्व असलेले लोक अशी टीकाटिप्पणी करीतही नाहीत आणि विचार, समज आणि जाणीवा परिपक्व असलेले भुक्तभोगी ते मनावरसुद्धा घेत नाहीत. मानवाला मानवी hardware कडून, मानवी software कडे घेऊन जाणारे आणि त्याविना पर्याय नाही हे सांगणाऱ्या युगात आपण पोहोचलेलो आहोत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, ६ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा