रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

डॉ. राधाकृष्णन : काही नोंदी

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त तीन गोष्टींची नोंद अवश्य घ्यायला हवी.

१) त्यांचे पहिले पुस्तक होते- The Philosophy of Rabindranath Tagore. टागोरांचे तत्वज्ञान हा भारतीय आत्म्याचा सच्चा आविष्कार होता, असे त्यांचे मत होते.

२) राष्ट्रपती झाल्यावर त्यांना १० हजार रुपये पगार मिळत होता. त्यातील केवळ २५०० रुपये ते घेत होते. त्यातील उत्पन्न कर वजा करून १९०० रुपये ते स्वीकारत असत. आपली गरज तेवढ्याने भागत असल्याने त्यापेक्षा अधिक घेणे योग्य नाही असे त्यांचे मत होते. उरलेले ७५०० हजार रुपये, म्हणजे ७५% पगार ते पंतप्रधान निधीत जमा करीत. समाजाच्या आजच्या मानसिकतेला हा आरसा दाखवण्याची गरज आहे.

३) ते स्वत: देश विदेशात प्राध्यापक होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. कोलकाता विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी स्वत:च आपला जन्मदिवस साजरा न करता, करायचाच असेल तर तो शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले होते. यातील आपला जन्मदिन साजरा करू नये ही सूचना त्यांचे मोठेपण दाखवते. त्याच वेळी शिक्षक दिन म्हणून आज असलेली अवस्था डोळ्यात झणझणीत अंजन घालते. वास्तविक प्राथमिक शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिकवणारे शिक्षकच. मात्र त्यांचा जन्मदिवस शिक्षकांसाठी म्हणजे शालेय शिक्षकांसाठी म्हणजे कमी प्रतीच्या शिक्षकांसाठी असल्याचा समज समाजाने करून घेतला आहे. प्राध्यापक मंडळी स्वत:ला शिक्षक समजत नाहीत. महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिनाचे कार्यक्रम होत नाहीत. अगदी पंतप्रधान वा राष्ट्रपती यांचे कार्यक्रम सुद्धा शालेय वर्तुळापुरते मर्यादित असतात. दुर्दैव याशिवाय दुसरे काय म्हणता येईल?

- श्रीपाद कोठे 

५ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा