अपेक्षेप्रमाणे श्री. अमित शहा यांच्या भाषाविषयक वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे. यातील बहुतेक चर्चा फारशा गंभीर अन महत्वाच्या नाहीत. कारण नेहमी प्रमाणेच त्यात 'माझा रस्ता' की 'तुझा रस्ता' एवढेच आहे. भारतात भाषेचे हे संघर्ष गेल्या शंभरेक वर्षातले आहेत. त्याआधी ते नव्हते. लोक आसेतू हिमाचल फिरत, व्यवहार करत, व्यापार करत, तीर्थयात्रा करत, वसती करत, चिंतन करत; ते या साऱ्या भाषांसह. कसे करीत असतील हे सारे? आम्ही कधीच हा प्रश्न विचारत नाही. त्रिपुराला गेलो असताना मला याचा उलगडा झाला. सगळ्या ईशान्य भारतात डझनावारी जमाती आहेत. त्यांच्या त्यांच्या भाषा आहेत. या सगळ्या जनजातींमध्ये व्यवहारही होत असतात. कसे होतात हे व्यवहार? व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या भाषेचा प्रश्न त्यांनी कसा हाताळला? तर त्यांच्या वेगवेगळ्या बोली असल्या तरी परस्पर व्यवहार करताकरता एक मिसळ संपर्क भाषा निर्माण झाली. त्याला म्हणतात कोकब्रोक.
असाच प्रकार भारतीय भाषांच्या संबंधात ही होता. उर्दू हेदेखील याचे एक उदाहरण. परंतु मानवी जीवनाकडे इतक्या सहजतेने पाहणे न जमणाऱ्या अभारतीय लोकांच्या सव्वाशे वर्षांच्या सत्तेने भारतीय समाजदेखील दांभिक मानवीय अहंमन्यतेने भरून गेला. श्रेष्ठ कनिष्ठ भाव, मान सन्मानाच्या दळभद्री कल्पना, वर्चस्व गाजवण्याची लालसा, शास्त्रीयतेचे कृत्रिम मापदंड; अशा एक ना अनेक विकृती या समाजात फोफावल्या. दुर्दैवाने आता तेच सारे योग्य वाटू लागले आहे. पूर्वीही इतक्या सगळ्या भाषा असून संघर्ष झाले नाही कारण आम्ही एक राष्ट्र होतो. आज भाषेच्या आधारे एक करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मूलतः एक असणे आणि विविध गोष्टींचे ऐक्य निर्माण करणे यात फरक आहे. हीच दांभिक मानवीय अहंमन्यता. 'फुलणे' आणि 'घडवणे' या दोन शब्दात भारतीय आणि अभारतीय यांचा सारा आशय येऊन जातो. भारताचे चिंतन, भारताचा विचार, भारताची दृष्टी 'फुलणे' आहे. अभारतीय चिंतन, अभारतीय विचार, अभारतीय दृष्टी 'घडवणे' आहे. मानवी कृती, कर्म, प्रयत्न, अचूकता, शास्त्र इत्यादी 'फुलण्याला' सहायक व्हावे म्हणजे भारतीयता. मानवी कृती, कर्म, प्रयत्न, अचूकता, शास्त्र इत्यादी 'घडवण्यासाठी' करणे म्हणजे अभारतीयता. हे थोडे क्लिष्ट, जटील वाटू शकते. पण सगळे सोपेसोपेच असायला हवे अशी अपेक्षा का बाळगावी? उत्तम, उदात्त, उन्नत यासाठी सोपेपणाचा आग्रह जरा बाजूला सारायला काय हरकत आहे?
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १८ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा