बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

जीवनरस आणि ऐक्य

कावेरी पाणीवाटप प्रश्न, मराठा महामोर्चे आणि त्याच्या उत्तरी मोर्चे या दोन्ही गोष्टीत ऐक्याचा अभाव दिसतो. आज सुरु असलेल्या गणेश विसर्जनात मात्र ऐक्याचं दर्शन होतं. ऐक्य नसणं वा ऐक्य असणं हे नेमकं काय असतं? ऐक्य आहे म्हणजे काय आणि ऐक्य नाही म्हणजे काय? एकतेसाठी एक उदाहरण अनेकदा सांगितलं जातं. काड्यांच्या मोळीचं. एक काडी तोडता येते, पण काड्यांची मोळी मात्र तोडता येत नाही. त्यामुळे एकमेकांना धरून ठेवणे. खरं तर हे खूपच बाळबोध उदाहरण आहे. त्याची काही कारणे आहेत. १) मोळी बांधलेली दोरी तुटली तर काड्या पुन्हा विखरून जातील. २) ही दोरी कुजून तुटू शकते किंवा कोणी ती तोडूही शकतं. ३) एकदा मोळी बांधली की बाहेरच्या काडीला त्यात जागा नाही मिळू शकत. बाकी काड्यांची दुसरी मोळी बांधावी लागते. ४) दोरी ढिली बांधली तर काड्या सुटून जातील आणि करकचून बांधली तर काड्यांना काच बसेल, त्या तुटून जातील. ५) एकाच दोरीच्या साहाय्याने बळाने कडूनिंब, चंदन, साग, तुळस, अशोक सगळ्या काड्या एकत्र बांधता येतील. या वेगवेगळ्या काड्या एकत्र राहतील, पण एक होणार नाहीत. त्यांचे त्यांचे गुण तसेच राहतील.

हे सगळे माणूस, मानवी समाज, त्याला एकत्र ठेवण्यासाठी असणाऱ्या कुटुंब, जाती (species), वर्ण, वंश, राज्य, कायदे इत्यादी गोष्टी यांना लावून पाहिले तर... माणसांना बांधून ठेवणाऱ्या या दोऱ्या कधी काचतात, कधी तुटतात, कधी मर्यादित करतात, कधी त्यावर आघात होतात. विचार, भावना, गरजा, भय, इच्छा किंवा एखादे बाह्य कारण यांनी एकत्र येणे हे खरे ऐक्य नसते. एक तर त्यातून ऐक्य निर्माणच होऊ शकत नाही अन झालेच तर ते तात्पुरते राहते. बरे काड्या एकत्र बांधल्यावर काही काळ तरी निमूट राहतील एकत्र. पण माणूस तर सतत बदलता, एके जागी शांत राहणार नाही. सतत चळवळ. कारण सतत बदलणाऱ्या जाणीवेचेच नाव आहे माणूस. त्याची मोळी कशी बांधायची? शक्य आहे का ते? अशी मोळी बांधल्याशिवाय चालूही शकत नाही आणि अशी मोळी बांधताही येत नाही. बांधली तर टिकत नाही. असं हे त्रांगडं आहे.

दुसरं एक उदाहरण झाडाचं आहे. मूळ, खोड, फांद्या, फुलं, फळं, शेंगा इत्यादी वेगवेगळं पण झाड मात्र एकच. त्यांची मोळी न बांधताही. शिवाय एक फुल तोडलं, एखादी फांदी तुटली तरीही नवीन येते. कारण मुळापासून शेंड्यापर्यंत एकच जीवनरस वाहत असतो. त्या जीवनरसामुळेच झाडाच्या सगळ्या घटकात ऐक्य असतं. हे आंतरिक ऐक्य असतं. म्हणूनच त्यात संघर्षही नसतो आणि मारूनमुटकून घडवलेल्या एकतेचे धोके वा मर्यादाही नसतात. ते अंगभूत ऐक्य असतं. मानवी ऐक्य उत्पन्न होण्यासाठी असाच जीवनरस मानवी समाजात वाहायला हवा. जाणीवांचा विकास (भावनांचा नव्हे) हाच तो जीवनरस राहील. त्याला पर्याय नाही. देवाणघेवाण, हिस्सेवाटे, तागडीचे मोजमाप, स्वातंत्र्य, समता, हक्क, कर्तव्य, न्यायअन्याय इत्यादी कशानेही ऐक्य येणार नाही. जाणीवांचा विकास हाच ऐक्याचा महामार्ग आहे आणि तो महामार्ग चालला तर अन्य प्रश्न निर्माणच होणार नाहीत.

श्री गणेश मानवी समुदायाला जाणीवांच्या विकासाचा आशीर्वाद देवोत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, १५ सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा