रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

अनुदार

मित्र यादीतील एका मित्राने काल एक पोस्ट टाकली की, `अनेक जण देवादिकांचे फोटोबिटो टाकतात. वैताग असतो. अशा मित्रांना यादीत ठेवावे की नको याचा विचार करतोय.' शब्द इकडे तिकडे होऊ शकतात पण आशय मात्र हाच आहे. पोस्ट टाकणारे नामांकित व्यक्ती आहेत. पण किती अनुदार. कोणी देवादिकांचे फोटो टाकतात तर टाकतात. त्याने आपल्याला काय त्रास? पण सहनशीलता दूर पळाली की मग ती हळूहळू दुष्प्राप्य होते. मला आवडते किंवा नावडते, मला पटते किंवा न पटते; हेच स्नेह, मैत्री, आपलेपणा यांचे निकष आहेत का? असावेत का? `मी' ला इतके गोंजारायचे की हळूहळू `मी'चंच एक छोटं बेट तयार होतं. हे अगदी खरं आहे की, आपले बिलकुल मतभेद होणार नाहीत, अशी कदाचित एकही व्यक्ती जगात नसते. विविध मुद्यांवर विविध लोकांशी कमीअधिक सूर जुळत असतात. पण ते बाजूला ठेवून जगासोबत राहण्यात काहीही गैर नाही. आपल्याला ते जमत नसेल तर ती आपली मर्यादा म्हणायला हवी. `हो आहे माझी मर्यादा. माझी माझ्याजवळ. तुम्हाला काय घेणेदेणे?' असा प्रश्न यावर येऊ शकतो. अर्थात, आपल्या अनेक वैयक्तिक आणि असंख्य सामाजिक अडचणी याच भूमिकेतून जन्म घेत असतात याचा विचार करण्याची, असा युक्तिवाद करणाऱ्यांना फिकीर करण्याची गरज नसते. पुलंनी रंगवलेले `रावसाहेब' पुन्हा एकदा समाजाने नीट समजून घेण्याची निकड मात्र जाणवते. ज्यांच्या पोस्टवरून हे लिहिलं ते आता त्यांच्या यादीत मला ठेवतात की नाही माहीत नाही.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा