रविवार, ३० एप्रिल, २०२३

तीन चांगल्या गोष्टी

आज तीन चांगल्या गोष्टी वाचल्या.

१) विद्यापीठाच्या जागेत आठ हजार वृक्ष लावणार. हवेचा दर्जा चांगला करण्यासाठी महापालिकेला उपलब्ध झालेल्या निधीतून हे होणार आहे. अशीच छोटी छोटी पुष्कळ वनं तयार करावीत. अन सोबत छोटे छोटे अनेक पाणवठेही. पण यासोबत हवेचा दर्जा कमी करणाऱ्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्नही व्हावा. नाही तर हवेचा दर्जा आणखी आणखी खालावणार अन त्यावरचे उपाय निरर्थक होणार. असे होऊ नये.

२) कपडे खरेदी टाळा, प्रदूषण टाळा; हा लेख. लेख एका महिलेनेच लिहिला आहे हे विशेष. कारण खरेदी अन त्यातही कपडे खरेदी यासाठी महिलांचा विशेष पुढाकार असतो. हा विषय नवीन नसला तरीही नव्याने पुढे आला आहे. वास्तविक कपडेच नव्हे तर एकूणच खरेदीचा जो रोग माणसाला लागला आहे त्याचा विविध अंगांनी विचार आवश्यक झालेला आहेच.

३) प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव निर्माण करण्याच्या केंद्राच्या योजनेशी संबंधित बातमी. ही योजना चांगली आहे यात वादच नाही. ती यशस्वी होईल यावरही शंका घेण्याचे कारण नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या तलावांमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा व्यवसाय होऊ नये. व्यवसाय झाल्याने कदाचित gdp वाढेल पण त्याचा मोह टाळून; नैतिकता आणि कोणीही (यात पशु पक्षी वृक्ष वेली झाडे हेही आले) तहानलेलं राहणार नाही हे समाधान यांना महत्व द्यावं. 'आमचा gdp कदाचित थोडा कमी असेल, पण आमच्या येथे कोणीही तहानलेलं नाही अन आमची नैसर्गिक प्राणवायू निर्मिती तुमच्यापेक्षा जास्त आहे' हे जगाला ठणकावून सांगण्याची तयारीही केली पाहिजे. शिवाय आज नद्यांचे पाणी अडवून जलसाठे केले जातात. प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या जलसाठ्यांमुळे आता, या तलावांमधून नद्या उगम पावाव्यात.

- श्रीपाद कोठे

१ मे २०२२

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

तुकडोजी महाराज आणि संघ

आज तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्यांचा रा. स्व. संघाशीही संबंध आला होता. १९४० च्या नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात एक दिवस रात्री त्यांच्या खंजिरी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. निल सीटी शाळेत झालेल्या या भजनाला संघ संस्थापक डॉ. हेडगेवार उपस्थित होते. गोळवलकर गुरुजी या वर्गाचे सर्वाधिकारी होते.

३० डिसेंबर १९४३ च्या ब्रिटिश सरकारच्या गुप्तचर अहवालातही तुकडोजी महाराज व  संघ यांच्या संबंधांचा उल्लेख आहे. संघ आपल्या कार्यवाढीसाठी तुकडोजी महाराजांची मदत घेत असल्याचे त्यात म्हटले होते.

१९४८ च्या गांधीजींच्या हत्येनंतर मात्र संघ व तुकडोजी महाराज यांच्या संबंधांबाबत बरेच समज गैरसमज दोन्ही बाजूंना झाले होते.

परंतु १९६४ साली गोळवलकर गुरुजींच्या पुढाकाराने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली त्यावेळी त्यात त्यांचा सहभाग होता. मुंबईतील पवईच्या चिन्मय आश्रमात झालेल्या विहिंप स्थापना बैठकीला ते उपस्थित होते.

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०२२

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

आवाहन

काल संभाजी भिडे यांना अपघात झाल्याची माहिती फेसबुकवर पाहिली. एका वृत्तपत्राच्या साईटवर पण ती होती. त्या पोस्टवर शेकड्याने कमेंट होत्या. त्यात खूप कमेंट्स वाह्यात प्रकारच्या होत्या. यात नवीन काही नाही. काहीच नाही. सगळ्यांना आता ते सवयीचे झाल्यासारखे आहे. आपल्याला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या व्यक्तींबद्दल, समूहांबद्दल, संघटना वा संस्थांबद्दल, विचारांबद्दल, पक्षांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरून बोलणे, लिहिणे खूप वाढले आहे. हे योग्य नाही, चांगले नाही असे सगळ्यांनाच वाटते. तरीही हे वाढत्या प्रमाणात सुरू आहे. क्रिया, प्रतिक्रिया सुरू असतात. परंतु हे थांबायला हवे असे ज्यांना, ज्यांना मनापासून वाटते; विश्वास, सौहार्द वाढावे असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांच्यासाठी एक विनंतीवजा आवाहन - 'मी हिणकस भाषा वा भावना यापासून दूर राहीन. मी अशा भाषेचा अजिबात वापर करणार नाही. अशा भाषेला अन भावनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुजोरा देणार नाही. त्यांना लाईक्स देणार नाही. सोबतच मी ज्यांना सांगू शकेन, म्हणू शकेन त्यांना हेच आवाहन करेन. याबाबत माझे-तुझे विचार मी करणार नाही.'

- श्रीपाद कोठे

२८ एप्रिल २०२२

सोमवार, २४ एप्रिल, २०२३

उपक्रम

थोड्या वेळापूर्वी डोंबिवलीहून फोन होता. 'तुमचा योगी अरविंद यांच्यावरील लेख वाचला. मला उत्तरापारा भाषणासंबंधी पुस्तक हवं आहे. कुठे, कसं मिळेल?' त्यावर बोलणं झाल्यावर थोडं अवांतर बोलले. गृहस्थ निवृत्त आहेत अन मूळ कोकणातले आहेत. गेल्या वर्षी विवेकानंद, रामकृष्ण, अरविंद आणि अन्य सतसाहित्याची २०० पुस्तके त्यांनी खरेदी केली आणि कोकणातल्या आपल्या गावी जाऊन तेथील शाळेत दिली. मुलांनी वाचावी म्हणून. शाळेतल्या शिक्षिकांनाही आनंद झाला. किती माणसे अनामपणे काय काय करत राहतात नाही. जग चालतं ते अशा माणसांमुळेच. २००५ साली आम्ही एक उपक्रम संस्कार भारती अंतर्गत घेतला होता. संत मीराबाईंच्या जन्माला ५०० वर्षे झाल्यानिमित्त. नागपुरातल्या ३२ शाळांमध्ये मीराबाईंचे चरित्र कथाकथन रुपात सांगण्याचा. शाळांना तो कार्यक्रम इतका आवडला होता की, असा उपक्रम सतत चालवा. आम्ही वेळ देत जाऊ, असे त्यांचे म्हणणे होते. दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. पण शाळांमध्ये खूप काही करता येतं. अनेक जण करतातही. पण प्रमाण खूप वाढायला हवे.

- श्रीपाद कोठे

२५ एप्रिल २०२२

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

संघटना आणि समर्पण

काल एका पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया -

संघटना हे एक यंत्र असतं अन समर्पण हा भाव असतो. यंत्राला भाव समजत नाही. संघटन वाढवणे आणि कार्यकर्त्यांची मानसिकता घडवणे यासाठी भाव असतो. पण जीवनाचा व्यवहार हा एक तिसरा घटक असतो. हा लक्षात घेऊन सगळा विचार करावा लागतो. पण जीवन दुर्लक्षित करून भाव पक्ष गृहीत धरला जातो तेव्हा संघटनही उरत नाही, भावही नासतो आणि पांथिकतेकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीप्रमाणेच संघटनेच्या वाढीचेही टप्पे असतात. त्या त्या टप्प्यांवर अनेक गोष्टींची पुन्हा पुन्हा मांडणी करावी लागते. जुन्या घराची दुरुस्तीच म्हणा ना. त्याऐवजी भंपक आदर्शवाद सांगत राहिलं तर काहीही साध्य होऊ शकत नाही. पुण्याई पण लयास जाते.

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०२२

दैव आणि प्रयत्न

इंग्रजीत असं म्हणतात की, 99% perspiration and 1% inspiration. हे खरंच आहे. पण गंमत ही आहे की, निर्णायक घटक असतो तो एक टक्काच. तो एक टक्का असेल तर ९९% पैकी फक्त ९% असेल तरी चालून जातं. कधी कधी तर त्याहूनही कमी सुद्धा चालतं. अन तो एक टक्का नसेल तर अगदी तुडुंब ९९% टक्के असेल तरी काहीही उपयोग नसतो.

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०२२

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

हिंदुत्व

साम्यवाद, समाजवादी, इस्लाम, ख्रिश्चनीती इत्यादी वाईट वा जगाला भारभूत का आहेत? त्यांची ती नावे आहेत म्हणून का? याचं नि:संदिग्ध उत्तर आहे नाही. त्यांची ती नावे आहेत म्हणून ते भारभूत नाहीत. तर त्यांनी शिकवलेल्या, पुरस्कारलेल्या, उचलून धरलेल्या बाबींमुळे ते भारभूत झाले आहेत. द्वेष, सूड, प्रतिशोध, बदला, अद्दल घडवणे, वर्चस्व गाजवणे, सत्ताकांक्षा, धनाकांक्षा, आकंठ उपभोग, इच्छा- वासना- मनोभाव- यांना अवाजवी महत्व, संकुचितता, अपुरे विचार आणि त्याला मिळालेली करुणेची जोड यामुळे जन्माला घातलेली भ्रामक शब्दावली; या आणि यासारख्या बाबींमुळे हे सगळे विचार, त्यांच्या विचारधारा, त्यावर आधारित व्यवस्था आणि रचना; जगाला भारभूत झाले आहेत.

हिंदुत्व जगासाठी कल्याणदायी आहे तेही त्याचे नाव हिंदुत्व आहे म्हणून नाही. तर त्याने शिकवलेल्या, पुरस्कारिलेल्या, उचलून धरलेल्या बाबींमुळे. सगळ्यांचा आदर, विसरा आणि क्षमा करा वृत्ती, सहकार्याची भावना, धन आणि सत्ता हे आकांक्षेचे विषय नाहीत ही शिकवण, संयमित उपभोग, इच्छा, वासना, मनोभाव यांना मर्यादित महत्व, विशालता, पूर्ण विचार आणि त्याला करुणेची जोड यातून विकसित झालेली भ्रम उत्पन्न न करणारी शब्दावली, या आणि यासारख्या बाबींमुळे हिंदुत्व हा जगाला आधार वाटतो, भार नाही.

कोणत्याही कारणाने हिंदुत्वाचं हे कॅरॅक्टर बदललं तर ते हिंदुत्व राहणार नाही आणि जगाला आधारही देणार नाही. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूगर्भातील कणांची फक्त संख्या जरी किंचित बदलली तरी ते मूलद्रव्य काही तरी वेगळं होऊन जातं. ते ते राहत नाही. हिंदुत्वाच्या अणूगर्भातील कणांचाही गंभीर साक्षेप हवा.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०२२