शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

Black money declaration

black money declaration च्या काल संपलेल्या योजनेत ६५ हजार कोटी रुपये एवढा काळा पैसा उघड झाला आहे. सुमारे ६५ हजार नागरिकांनी हा जाहीर केला आहे. हा आकडा वार्षिक अर्थसंकल्पाच्या ३-४ टक्के आहे. यातून सुमारे ३० हजार कोटी रुपये सरकारला करापोटी मिळणार आहेत. हा आकडा सुमारे १.५-२ टक्के एवढा आहे. हा आकडा फार मोठा नक्कीच नाही. पण तो लहानही नाही. चिदंबरम यांनी देशभरातील शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती, तो आकडा ६०-६५ हजार कोटी एवढाच होता. ठीक आहे. छोट्या प्रमाणात का होईना, काहीतरी सकारात्मक घडले.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१६

सर्जन- विसर्जन

आजपासून १० दिवसांचे शक्तीपर्व सुरु झाले. मां वैष्णोदेवी पासून मां कन्याकुमारी पर्यंत आणि मां कामाख्या पासून मां अंबादेवी पर्यंत संपूर्ण भारतभर, सगळ्या प्रांतात शक्तीचा हा जागर चालणार आहे. गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गापूजा आणि उत्तरेतील रामलीला यांची चर्चा होते. त्यांचे मार्केटिंग देखील चांगले झाले आहे. त्यामुळे ते सगळ्यांना माहिती आहेत. मराठी लोकांना घटस्थापना माहिती आहे. मात्र सगळ्या प्रांतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे शक्तीपर्व साजरे होते. अगदी दक्षिणेतील पाच प्रांतात सुद्धा.

या सगळ्या प्रकारच्या शक्तीपूजेत कुठे ना कुठे मातीचा संबंध आहे. घट या स्वरुपात, दुर्गा प्रतिमा या स्वरुपात किंवा तामिळनाडूतील कोलू बाहुल्या अथवा शेती अवजारांच्या पूजेच्या स्वरुपात. माती हे सर्जन आणि विसर्जन दोन्हीचं प्रतिक आहे. संपूर्ण जीव सृष्टीचं सर्जन मातीतून होतं आणि त्याचं विसर्जन सुद्धा मातीतच होतं. सिमेंटकॉंक्रीट किंवा टाईल्स किंवा फरशा यातून सर्जनही होत नाही, अन त्यात विसर्जनही होत नाही. शक्तीपूजा हे सर्जन-विसर्जन यांचं केवळ प्रतिक बनून राहू नये. शक्तीपूजा जीवनाचा, जगण्याचा भाग बनावी. आपल्या सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये हे सर्जन-विसर्जन आहे. अगदी देवांचं सुद्धा. याचा आशय खूप मोठा अन जीवनव्यापी आहे. त्याचा जेवढा विचार माणूस करत जातो, तेवढं ते त्याच्या क्षणोक्षणीच्या जीवनात झिरपत जातं.

या सणांच्या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने त्यांच्यामागील भावांचं कालसुसंगत प्रतिपादन सुद्धा सयुक्तिक असतं. सध्याच्या काळात सर्जन आणि विसर्जन यांचं प्रतिक असलेल्या मातीकडेच लक्ष वेधण्याची गरज आहे. अनेक प्राणी, पक्षी लुप्त होत आहेत. त्याविषयी जागृती आणि त्यांचं संगोपन यांचा प्रयत्नही सुरु झालेला आहे. हळूहळू मातीही लुप्त होईल का असा प्रश्न भेडसावू लागला आहे. शहरांमध्ये तर तशी वेळ आलेलीच आहे. सर्जन आणि विसर्जन यांचा आधार असलेली माती आता विकत घेतली जाऊ लागली आहेच. आपले अहंकार, आपले दंभ, आपले दर्प, आपली कथित सौंदर्यदृष्टी, आपला कथित आरोग्यविचार, आपले तथाकथित विकासधोरण यांनी आपण आणि माती यांची तोडलेली नाळ या शक्तीपूजेनिमित्त पुन्हा जोडून घेऊ या. विकास, आनंद, celebration इत्यादी ज्या आपल्यासाठी आहे; त्या आपलेच अस्तित्व उरणार नाही अशी वेळ येऊ नये, असे वाटत असेल तर; ज्या मातीतून आपण आलो आहोत आणि ज्या मातीत पुन्हा परतून जायचं आहे; त्या मातीशी जोडून घेऊ या.

जगदंबा आम्हाला तशी शक्ती, बुद्धी, युक्ती देवो.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१६

समता

समता !! काय आहे समता? समता ही मनाची एक उच्च अवस्था आहे. संपूर्ण समता हीच वास्तविक माणूस गाठू शकेल अशी सगळ्यात उन्नत अवस्था आहे. and it has to be attained. कोणतीही कारणे असोत, पण आम्ही मात्र तिला अवस्थेऐवजी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहोत. गेल्या कित्येक दशकांचा किंवा वैश्विक पातळीवर बोलायचे तर गेल्या काही शतकांचा या प्रयत्नांचा परिणाम मात्र अपेक्षेच्या नेमका विरुद्ध आहे. कारण जी बाब आंतरिक आहे, जिच्या साहाय्याने माणसाची आतली उंची वाढत जाऊन परिणामी बाह्य व्यवहार स्पृहणीय होऊन जाईल, त्या आंतरिक गुणसमृद्धीला आम्ही बाह्य व्यवहाराचा मापदंड ठरवला. आंतरिक गुण समुच्चयाच्या परिणामी बाह्य व्यवहार परिष्कृत व्हावा याऐवजी, धरून बांधून केलेल्या बाह्य व्यवहारावरून आंतरिकता जोखण्याने; खोटेपणा, फसगत, फसवणूक, लबाडी, उथळपणा हे सारे ओढवून घेतले आणि आंतरिक गुणसमृद्धीच्या ठिकाणी गुणात्मक अधोगती पदरात पाडून घेतली. समता ही बाह्य व्यवहाराचा मानदंड स्वीकारून आम्ही- १) भावना शांतवणारे भारतीय शास्त्रीय संगीत आणि भावना उत्तेजित करणारे संगीत यांना एका पातळीवर आणले, २) लहान मुले आणि वृद्ध यांना समान ठरवून त्यांच्या अधिकार आदींची भंपक मांडणी केली, ३) स्त्री आणि पुरुष समान ठरवून दोघांनाही स्वाभाविक विकासापासून भरकटवण्याचा प्रयत्न करतो आहोत, ४) साधने, अनुभव, वातावरण यातील फरक लक्षात न घेता ग्रामीण आणि शहरी लोकांना एकाच पारड्यात तोलू लागलो, ५) शेती आणि उद्योग यांना सारखेच मापदंड लावण्याचा वेडा अट्टाहास धरू लागलो, ६) ज्ञान आणि चावटपणा यांची गल्लत समाजाच्या माथी मारू लागलो, ७) शत्रू आणि मित्र ओळखण्याची दृष्टी गमावून बसलो, ८) जीवनातील उदात्त आणि शाश्वत गोष्टींसाठी बाजी लावणारे आणि बटबटीत हिंसक जीवनवादी यांना एकाच दृष्टीने पाहू लागलो. आंतरिक विकासाच्या असंख्य शक्यता, भावनांचा, जाणिवांचा विकास बाधित केला. परंतु मानवी विचार व्यवहाराच्या अन्य सगळ्याच बाबींप्रमाणे या बाबतीतही होते आहे. आम्हाला काय हवे आहे अथवा काय वाटते याने; आमच्या विचार व्यवहाराचे होणारे परिणाम आकार घेत नाहीत. कारण आम्ही `सत्याचा' शोध घेण्याऐवजी, `सत्याचा' मार्ग अनुसरण्याऐवजी आम्हाला काय वाटते याचा दुराग्रह धरून ठेवलेला आहे. आयुष्यभर `सत्याचा' आग्रह धरणाऱ्या महात्म्याची उद्या जयंती आहे. सगळ्यांना `सत्यमार्गाची' आस लागो हीच त्या महात्म्याने कधीही ज्याचा हात सोडला नाही त्या ईश्वराला प्रार्थना.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१८

रक्तदान

आज राष्ट्रीय रक्तदान दिवस आहे पण रक्तदान करता आलं नाही याची रुखरुख आहे. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त  स्वतःच्या जन्मदिनाला दरवर्षी रक्त द्यायचं असं ठरवलं. आजवर तसं होतही आलं. त्याशिवाय वर्षातून एक दोनदा मागणीनुसार देत आलो. आतापर्यंत ५० वेळा देऊन झालं आहे. ६० चा आकडा गाठण्याची इच्छा आहे. अजून पाच वर्ष हाती आहेत. तीन चार महिन्यांपूर्वी रक्तपेढीतून फोन आला. त्याप्रमाणे गेलो. पण पहिल्यांदाच त्यांनी परत पाठवलं. हिमोग्लोबिन कमी आहे म्हणाले. मला हरकत नव्हती. म्हटलं, ही काही मोठी गोष्ट नाही. हिमोग्लोबिन लवकर पूर्ववत होईल. त्यांनी मात्र नकार दिला. आशा करतो की हिमोग्लोबिन लेव्हल त्यांना समाधानकारक होऊन पुन्हा रक्त देता येईल आणि ६० पर्यंत पोहोचता येईल. यातील 'मी'कडे दुर्लक्ष करून सदिच्छा असू द्याव्या.

सध्या देशभरातील रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या ०.९० टक्के एवढीच आहे. ती वाढायला हवी. त्यामुळे सगळ्या सुदृढ महिला पुरुषांनी वर्षाला एकदा तरी रक्त देण्याचे ठरवावे. एखादा दिवस निश्चित करता येऊ शकेल. आजकाल रक्त न देता प्लेटलेट्स देता येतात. माझा भाचा गेली काही वर्षे देतो आहे. त्याला रक्त देण्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पण दोन दानामधील काळ कमी असला तरी चालतो. त्यामुळे अधिक लोकांची गरज पूर्ण करता येते. ज्याला जे योग्य वाटेल त्यानुसार करावे. सगळ्यांनी पुढाकार घ्यावा.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०१९

मर्यादा

व्यक्तिगत संबंधांमध्ये मा. न्यायालये आजकाल खूप निर्णय देतात आणि मतप्रदर्शन पण करतात. यावर साधकबाधक विचार झाला पाहिजे. व्यक्तिगत संबंध हे केवळ व्यक्तिगत असतात म्हणून नाही, तर त्यांचे स्वरूप असे असते की, ते सरसकट कायद्याने define करता येत नाहीत. शिवाय त्यातील अनेक खाचाखोचा कितीही बुद्धिमान वकील किंवा न्यायाधीश असले तरीही लक्षात येतील वा समजतील असेही नसते. गुण, अवगुण, गरजा, परिस्थिती, क्षमता, स्वभाव, अन् या सगळ्यांची व्यक्तिगत संबंधात असलेली सरमिसळ ही कठोर चौकटीत बसवता येईल का? त्यामुळे व्यक्तिगत संबंधातील समस्या हाताळण्याचा वेगळ्या पद्धतींवर भर दिला पाहिजे. न्यायालयांनी देखील लोकांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. तसेच शक्यतो अशा केसेस दाखल करून घेण्यास नकारही द्यावा. छोट्या मोठ्या गोष्टीत किमान समजूतदारपणा न दाखवणाऱ्या लोकांसाठी न्याय व्यवस्थेने तरी आपला वेळ आणि ऊर्जा का खर्च करावी?

अशाच प्रकारे सरकारने काय करावे आणि करू नये याचाही विचार व्हायला हवा. जुन्या इमारती कोसळतात. त्यावेळी जुन्या इमारतींची तपासणी करण्याचे आदेश इत्यादी देण्यात येतात. त्याप्रमाणे तपासणी होते का आणि त्याचे पुढे काय होते हे ठाऊक नाही, पण या खाजगी इमारतींची तपासणी सरकारने का करावी? जोवर प्रत्यक्ष, दृश्यमान स्वरूपात समाजाला त्याचा त्रास नसेल तोवर सरकारला त्यात लक्ष घालण्याचे काय कारण? कारण जुन्या इमारतींची देखभाल इत्यादीमध्ये पुष्कळ गोष्टी गुंतलेल्या असू शकतात. त्याची आर्थिक बाजू ही तर फारच महत्त्वाची असते. सगळ्या खाजगी जुन्या जीर्ण इमारतींची डागडुजी, बांधणी, देखभाल इत्यादी खर्च आणि अन्य बाबी सरकार करेल का? ती जबाबदारी जर सरकार घेत नसेल तर उगाच त्या लोकांमागे सरकारी ससेमिरा का लावायचा? ज्याला त्याला त्याच्या नशिबावर सोडावे. आपल्या मर्यादा ओळखाव्या.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०२२

संस्कृती, व्यवस्था, कायदे, नियम, उत्तेजन, धोरणे, सल्ला, उद्दिष्टे, इत्यादी अनेक उपायांनी समाजाला सुशासित ठेवता येते, पण ते समजण्यासाठी आणि वापरण्यासाठी लागणारी क्षमता राज्यकर्त्यांच्या ठाई अभावानेच आढळते...

कळप नसावे

सध्या प्राजक्ता माळी या अभिनेत्रीच्या एका पोस्टची चर्चा सुरू आहे. तिला हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्नही होतो आहे. ज्यांना हिंदुत्वाला विरोध करायचा आहे त्यांनी तसे करणे ठीक आहे पण ज्यांचा हिंदुत्वाला विरोध नाही त्यांनी प्राजक्ताचे हिंदुत्ववादी projection करू नये. याच प्रक्रियेतून गांधी काँग्रेसचे, आंबेडकर दलितांचे, टिळक सवर्णांचे असे होत जाते. सावरकर हिंदूंचे याचीही प्रक्रिया अशीच असेल. मुळात या सगळ्या महापुरुषांचे विचार, भावना यांचे आवाहन अखिल मानवजातीसाठी आहे. त्यांच्या धोरणाबद्दल मतमतांतरे असू शकतात. परंतु त्यांना कळपात ढकलणे हे जेवढे चुकीचे तेवढेच त्यांना कळपात स्वीकारणे हेही अयोग्य. ने मजसी ने परत मातृभूमीला... ही प्रभू रामापासून सावरकरांपर्यंत एक परंपरा आहे. तो भारताचा इथॉस आहे. विरोधकांनी असो वा समर्थकांनी त्याचा कळप बनवू नये. विचारांना, भावनांना आणि महापुरुषांना लहान करू नये. तसे न केले तर बाजू थोडी पडती झाल्यासारखे वाटेल, कळप तयार केला तर थोडा पुरुषार्थ केल्यासारखे वाटेल, संघर्षाची अन् विजयाची थोडी खुमखुमी जीरेल; पण तेवढेच. त्यापेक्षा अधिक काही नाही. आपण सगळेच मोठं होण्याचा प्रयत्न करू या.

- श्रीपाद कोठे

१ ऑक्टोबर २०२२

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

चीड

चीड यायलाच हवी कधीकधी. प्रत्येक वेळी समजून घेण्याचा अतिरेक नकोच. अर्थात राग, चीड हेही प्रमाणात हवे. पण हवेच. कोणत्याही कारणाने अन्न बाहेर टाकणाऱ्यांबद्दल चीड यायलाच हवी. १) अन्नाचा अपमान, २) अस्वच्छता, ३) दुसऱ्यांना त्रास; यासाठी कारण ठरणाऱ्या लोकांची चीडच यायला हवी. अन्नाला आपण खूप महत्त्व देतो. सगळ्यांनी पोटभर जेवले पाहिजे (कधीकधी पोटापेक्षा जास्त झाले तरी चालेल पण आग्रह करायचा) ही आपली वृत्ती असते. कोणाला उपाशी ठेवले तर शाप लागतील असे आपल्याला वाटते. परंतु या वृत्तीचा अतिरेक झालेला आहे की काय असे वाटते. दोन घास कमी जेवावे पण अन्न टाकण्याची वेळ येऊ नये, असे सांगण्याची वेळ आलेली आहे. पाहुणे असतील तर त्यांना दोन घास कमी खाऊ घालावे किंवा स्वतः दोन घास कमी खावे पण अन्न रस्त्यावर, उघड्यावर, टाकू नये. भूकेचे शाप लागत असतील तर अन्नाचे शाप लागत नाहीत का? आपल्याला मोठाल्या मोटारी हव्यात, महागडे फोन हवेत पण वृत्ती मात्र गावंढळ. आपल्याला भूकेचे शाप नकोत पण अन्नाचे चालतात. मुळात आपण ग्राम संस्कृतीतून एका वेगळ्या नागर संस्कृतीत आलेलो आहोत. गाय खाऊन घेते, कुत्री खाऊन घेतात वगैरे करणं आपल्याला शोभत नाही. कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सुद्धा यजमानाला सांगितले पाहिजे - अपेक्षित लोकांपेक्षा दहा वीस कमी संख्येचा स्वयंपाक करा. वेळेवर कमी पडलं तर काय करायचं याची पद्धत विकसित करायला हवी. कारणं सांगत अन्न फेकून वा टाकून देण्याची सवय मोडली-च पाहिजे.

अन् अन्न बाहेर टाकून दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या, अस्वच्छता पसरवणाऱ्या लोकांबद्दल आपला कटाक्ष तिटकाऱ्याचाच असला पाहिजे. मोक्ष वगैरे नाही मिळाला तरी चालेल.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०२३