आज राष्ट्रीय रक्तदान दिवस आहे पण रक्तदान करता आलं नाही याची रुखरुख आहे. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त स्वतःच्या जन्मदिनाला दरवर्षी रक्त द्यायचं असं ठरवलं. आजवर तसं होतही आलं. त्याशिवाय वर्षातून एक दोनदा मागणीनुसार देत आलो. आतापर्यंत ५० वेळा देऊन झालं आहे. ६० चा आकडा गाठण्याची इच्छा आहे. अजून पाच वर्ष हाती आहेत. तीन चार महिन्यांपूर्वी रक्तपेढीतून फोन आला. त्याप्रमाणे गेलो. पण पहिल्यांदाच त्यांनी परत पाठवलं. हिमोग्लोबिन कमी आहे म्हणाले. मला हरकत नव्हती. म्हटलं, ही काही मोठी गोष्ट नाही. हिमोग्लोबिन लवकर पूर्ववत होईल. त्यांनी मात्र नकार दिला. आशा करतो की हिमोग्लोबिन लेव्हल त्यांना समाधानकारक होऊन पुन्हा रक्त देता येईल आणि ६० पर्यंत पोहोचता येईल. यातील 'मी'कडे दुर्लक्ष करून सदिच्छा असू द्याव्या.
सध्या देशभरातील रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या ०.९० टक्के एवढीच आहे. ती वाढायला हवी. त्यामुळे सगळ्या सुदृढ महिला पुरुषांनी वर्षाला एकदा तरी रक्त देण्याचे ठरवावे. एखादा दिवस निश्चित करता येऊ शकेल. आजकाल रक्त न देता प्लेटलेट्स देता येतात. माझा भाचा गेली काही वर्षे देतो आहे. त्याला रक्त देण्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. पण दोन दानामधील काळ कमी असला तरी चालतो. त्यामुळे अधिक लोकांची गरज पूर्ण करता येते. ज्याला जे योग्य वाटेल त्यानुसार करावे. सगळ्यांनी पुढाकार घ्यावा.
- श्रीपाद कोठे
१ ऑक्टोबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा