सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

जगणं म्हणजे

माणूस जगतो, वागतो म्हणजे काय? खूपदा वर्णन केलं जातं- जन्म आणि मृत्यू यांच्या मधील काळ म्हणजे जगणं. तरीही जगणं म्हणजे काय याचा उलगडा होत नाहीच. जो जन्म आणि मृत्यू यांच्या मधला काळ आहे, त्याचा आणि आपला काय संबंध? त्यामुळे हे वर्णन फार काही पदरात टाकत नाही. मग जगतो, वागतो म्हणजे काय? तर जगणे, वागणे म्हणजे respond करणे. अगदी आईच्या पोटातून निघालेल्या बाळापासून तिरडीवर ठेवण्याच्या अवस्थेपर्यंतचा माणसाचा प्रवास म्हणजे रिस्पॉन्स देणे. प्रत्येक क्षण म्हणजे रिस्पॉन्स. प्रतिसाद !! शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक गरजांना प्रतिसाद. अगदी कोणतीही कृती घ्या किंवा कोणताही विचार घ्या; कशा ना कशाला दिलेला तो प्रतिसाद असतो. आपण प्रत्येक जण जिला प्रतिसाद देतो, ती साद येते कोठून? ती आपल्याच आतून येते. भूक लागली की आतून साद येते. प्रश्न पडतो तो आतून येतो. कोणतीही गरज जाणवते ती आतून जाणवते आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण कृती वा विचार करतो. ही प्रत्येकाला येणारी साद वेगळी असते. म्हणूनच एकाच वातावरणात राहणारे वेगवेगळा प्रतिसाद देतात. एखादं निसर्गदृश्य किंवा चित्र किंवा अपघात किंवा घटना किंवा काहीही; त्याला किती प्रकारांनी प्रतिसाद मिळतो. का? कारण त्या बाह्य सादाला दिलेला आतला प्रतिसाद वेगळा असतो. हा आतला प्रतिसाद पुन्हा आपल्याला साद घालतो आणि आपण त्याला प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया देतो. ही आतल्या - बाहेरच्या साद आणि प्रतिसादाची एक अखंड मालिका म्हणजे जीवन. हे प्रतिसाद आपल्या गरजा भागवण्यासाठी असतात. गरज भागली की प्रतिसाद थांबतो वा बदलतो. यातूनच सुखदु:ख, हर्षविषाद, आकर्षण अपकर्षण, उत्साह निराशा; एवढंच काय सगळं अर्थकारण, समाजकारण, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, वैद्यक, शिक्षण, कला, साहित्य सगळं सगळं आकाराला येतं. सांगण्याची गरजसुद्धा साद घालते आणि त्यातून साहित्य, ग्रंथ आकाराला येतात. कला जन्म घेतात. अनेकानेक व्यवस्था याच गरजांना दिलेल्या प्रतिसादातून विकसित होतात. आपल्या गरजांचे प्रकार आणि प्रमाण यानुसार आपण विविध व्यवस्था, संघटना, गट इत्यादीत सामील होत असतो. अन गरज पूर्ण झाली की त्यातून बाहेर पडतो. एवढेच काय त्या त्या व्यवस्थेत, गटात वा संघटनेत, संस्थेत सुद्धा गरजेप्रमाणे बदल घडवून आणतो. अन आपल्याला suit होईल त्याप्रमाणेच त्यांचे आचारविचार पाळतो. याला कोणीही अपवाद नाही. कोणता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आपापल्या धार्मिक आज्ञा वा नियम आदी काटेकोरपणे पाळतो? कोणता कम्युनिस्ट कम्युनिझमच्या तत्वांचे तंतोतंत पालन करतो? किती कम्युनिस्टांनी व्यक्तिगत संपत्तीचा त्याग केलेला आहे? किती जण आहेत ज्यांनी संपूर्ण राज्यघटना वाचली आहे? अन पूर्ण राज्यघटना वाचणाऱ्यांपैकी किती जण रोज ती वाचत वाचत आपले दैनंदिन व्यवहार करतात? जेव्हा कुठेही कधीही व्यवहाराचा संघर्ष होतो तेव्हा, घटना म्हणा, कायदा म्हणा, धर्मग्रंथ म्हणा वा कोणताही प्रमाणग्रंथ काढून त्यानुसार चर्चा सुरु होते. पण तेव्हाही फक्त चर्चाच. वरचढ ठरतात गरज आणि तिला द्यावयाचा प्रतिसाद हेच. मग काय, हे सगळे ग्रंथ, शास्त्र, घटना, व्यवस्था, संस्था, संघटना, रचना निरर्थक म्हणायच्या? नाही. त्या निरर्थक नक्कीच नाहीत. नसतात. ते वरवर चढतानासाठी आधाराचे कठडे असतात. आपल्यापूर्वी जे चढले त्यांनी तयार केलेले. तोल जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग. तसेच त्याला टेकून अंमळ दम खाता येतो. अन त्याच्या आधारे थोडे थांबून किती चढलो याचा अंदाज घेता येतो. मात्र कठडा म्हणजे शिखर नाही. जगणे म्हणजे कठडा धरून ठेवणे नाही. जगणे म्हणजे शिखर सर करणे. शिखर गाठणे. अन प्रत्येकाला हे शिखर गाठावे लागते. इतके लोक चढले, असं म्हणून भागत नाही. आपल्या पूर्वी अनेकांनी शिखर गाठले म्हणून थांबता येत नाही. आपल्या पूर्वीचेही चढले, आपल्यालाही चढायचे आहे आणि आपल्यानंतरचेही चढणारच आहेत. नव्हे शिखर चढणे हीच होऊन गेलेल्या, असलेल्या वा येणाऱ्या सगळ्यांची नियती आहे. अन प्रत्येकाला चढाईची ही सुरुवात पहिल्या पावलानेच करावी लागणार आहे. ही relay race नाही. हे शिखर सतत साद घालत असते आणि आपण त्याला प्रतिसाद देत पुढे पुढे चालत असतो. ग्रंथ, गट इत्यादी आधाराला घेऊन. शिखर चढताना असंख्य वाटावळणे. कधी वाटतं आलं शिखर अन पोहोचावं तर लक्षात येतं किती फसगत झाली ते. मग कधी कंटाळून, कधी चिडून, कधी वैतागून बोटे मोडणे, नावे ठेवणे, आणखीन किती चालायचे आहे? असे प्रश्न उपस्थित करणे; असे सगळे सुरु असते. पण थांबता येत नाही. कारण शिखराची साद थांबू देणार नसते. शिखर गाठेपर्यंत. हो- अज्ञात शिखर गाठेपर्यंत. शिखर गाठले की मग सगळं निवांत...!!! ना प्रतिसाद देणे, ना कठडे धरणे.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा