आजपासून १० दिवसांचे शक्तीपर्व सुरु झाले. मां वैष्णोदेवी पासून मां कन्याकुमारी पर्यंत आणि मां कामाख्या पासून मां अंबादेवी पर्यंत संपूर्ण भारतभर, सगळ्या प्रांतात शक्तीचा हा जागर चालणार आहे. गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गापूजा आणि उत्तरेतील रामलीला यांची चर्चा होते. त्यांचे मार्केटिंग देखील चांगले झाले आहे. त्यामुळे ते सगळ्यांना माहिती आहेत. मराठी लोकांना घटस्थापना माहिती आहे. मात्र सगळ्या प्रांतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे शक्तीपर्व साजरे होते. अगदी दक्षिणेतील पाच प्रांतात सुद्धा.
या सगळ्या प्रकारच्या शक्तीपूजेत कुठे ना कुठे मातीचा संबंध आहे. घट या स्वरुपात, दुर्गा प्रतिमा या स्वरुपात किंवा तामिळनाडूतील कोलू बाहुल्या अथवा शेती अवजारांच्या पूजेच्या स्वरुपात. माती हे सर्जन आणि विसर्जन दोन्हीचं प्रतिक आहे. संपूर्ण जीव सृष्टीचं सर्जन मातीतून होतं आणि त्याचं विसर्जन सुद्धा मातीतच होतं. सिमेंटकॉंक्रीट किंवा टाईल्स किंवा फरशा यातून सर्जनही होत नाही, अन त्यात विसर्जनही होत नाही. शक्तीपूजा हे सर्जन-विसर्जन यांचं केवळ प्रतिक बनून राहू नये. शक्तीपूजा जीवनाचा, जगण्याचा भाग बनावी. आपल्या सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये हे सर्जन-विसर्जन आहे. अगदी देवांचं सुद्धा. याचा आशय खूप मोठा अन जीवनव्यापी आहे. त्याचा जेवढा विचार माणूस करत जातो, तेवढं ते त्याच्या क्षणोक्षणीच्या जीवनात झिरपत जातं.
या सणांच्या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने त्यांच्यामागील भावांचं कालसुसंगत प्रतिपादन सुद्धा सयुक्तिक असतं. सध्याच्या काळात सर्जन आणि विसर्जन यांचं प्रतिक असलेल्या मातीकडेच लक्ष वेधण्याची गरज आहे. अनेक प्राणी, पक्षी लुप्त होत आहेत. त्याविषयी जागृती आणि त्यांचं संगोपन यांचा प्रयत्नही सुरु झालेला आहे. हळूहळू मातीही लुप्त होईल का असा प्रश्न भेडसावू लागला आहे. शहरांमध्ये तर तशी वेळ आलेलीच आहे. सर्जन आणि विसर्जन यांचा आधार असलेली माती आता विकत घेतली जाऊ लागली आहेच. आपले अहंकार, आपले दंभ, आपले दर्प, आपली कथित सौंदर्यदृष्टी, आपला कथित आरोग्यविचार, आपले तथाकथित विकासधोरण यांनी आपण आणि माती यांची तोडलेली नाळ या शक्तीपूजेनिमित्त पुन्हा जोडून घेऊ या. विकास, आनंद, celebration इत्यादी ज्या आपल्यासाठी आहे; त्या आपलेच अस्तित्व उरणार नाही अशी वेळ येऊ नये, असे वाटत असेल तर; ज्या मातीतून आपण आलो आहोत आणि ज्या मातीत पुन्हा परतून जायचं आहे; त्या मातीशी जोडून घेऊ या.
जगदंबा आम्हाला तशी शक्ती, बुद्धी, युक्ती देवो.
- श्रीपाद कोठे
१ ऑक्टोबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा