*********
मानव जातीच्या इतिहासात इतके महान लोक होऊनही जग सुंदर, सुखी का झालं नाही? हा प्रश्न प्रत्येक माणसाला कधी ना कधी पडतोच. अन हे सत्यही आहे. कोणीच हे नाकारू शकत नाही. हां, त्रास आणि दु:ख यांचे विषय आणि प्रकार बदलले असतील, पण ते संपले मात्र नाहीत. आशावादी माणसाने सारवासारव करायची आणि निराशावादी माणसाने तक्रारीचा सूर वाढवायचा हे चालूच राहतं, बदलत मात्र काही नाही. का? कारण ते कधीच बदलणार नाही. हे मान्य करायला कठीण आहे. पचायला तर त्याहून कठीण आहे. पण सत्य हेच आहे की हे जग बदलणार नाही. मग दुसरा प्रश्न येतो, महान लोकांचा उपयोग काय? महान लोकांचं प्रयोजन काय? त्यांचा उपयोग आणि प्रयोजन एवढंच की; प्रत्येक जण, प्रत्येक कण, प्रत्येक क्षण, प्रत्येक भौतिक व अभौतिक (मानसिक, भावनिक, बौद्धिक इत्यादी) तरंग; महानतेकडे निघालेला आहे हे सांगणे. प्रत्येक प्रारंभ वेगळा आहे आणि पूर्णता ही त्या प्रारंभाची नियती आहे. हा प्रवास प्रत्येकाचा स्वतंत्र आहे. इकडून तिकडून काही घेणे, काही सोडून देणे, काही टाकून देणे; असं करत करत; प्रत्येक स्पंदन, प्रत्येक तरंग, प्रत्येक सृजन, प्रत्येक निर्मिती, प्रत्येक माणूस; पूर्णतेच्या दिशेने जातो आहे. प्रत्येकाचा प्रारंभबिंदू वेगवेगळा आहे. प्रत्येकाची गती वेगवेगळी आहे. ही प्रारंभाची वेळ आणि गती यामुळे अनंत विविधता, विषमता, संघर्ष असं सगळं दिसतं. हा प्रत्येकाचा प्रवास आहे. कोणाचाही प्रवास कोणी दुसरा करत नाही, करू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणत असत, या विश्वाचे असंख्य केंद्रबिंदू आहेत पण त्याचा परीघ मात्र एकच आहे. मग काय स्वतःसाठी किंवा इतरांसाठी चांगल्याचा प्रयत्न वगैरे करायचा नाही? किंवा का करायचा? तर प्रयत्न करायचाच. प्रयत्नाशिवाय, काहीतरी केल्याशिवाय कोणीही राहूच शकत नाही. फक्त एवढेच की, काही करताना स्वतःचं किंवा जगाचं अमुक असं होईल/ होऊ शकतं/ व्हायलाच हवं/ होणारच; असं जे काही त्या कृतीला चिकटलेलं असतं, ते सोडून द्यायचं. निरपेक्ष कर्म करत राहायचं. कारण ना आपल्या ना महान लोकांच्या काही करण्याने जगबिग बदलणार आहे. तर, आपलं कर्म, आपलं करणं, आपली कृती, आपली क्रियाशीलता आपल्याला पूर्णतेकडे नेणार आहे. प्रत्येक कणाला पूर्णतेकडे नेणे हेच या जगाचं प्रयोजन आहे. जग घडवणे वगैरे मानवाचं प्रयोजन नाही.
*********
'शेवटी सत्याचाच विजय होतो' हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इथे दोन प्रश्न निर्माण होतात - १) सत्याचा विजय शेवटीच का होतो? आधी का होत नाही? नेहमीच का होत नाही? या जगाच्या रहाटगाडग्याचा शेवट ठरवायचा कसा? २) विजयी होणारी प्रत्येक गोष्ट सत्यच असते का? दोन्ही प्रश्न एकत्रितच मनात ठेवून विचार करू.
एक ताजं उदाहरण घेऊ. छगन भुजबळ निर्दोष सुटले. त्यांची बाजू सत्याची आहे का? कोणी म्हणतील हो, कोणी म्हणतील नाही. वादाला अंत नाही. मग सत्य नेमके काय? कसे ठरवायचे? थोडं आजूबाजूला पाहिलं, थोडा इतिहास चाळला, थोडी तर्कबुद्धी वापरली; तर लक्षात येतं की; विजय पराजय हा तर एक खेळ आहे. कधी उजेडाचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी सद्गुणांचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी हिंसेचा विजय होतो कधी पराजय होतो. कधी शौर्याचा विजय होतो कधी पराजय. कधी बुद्धीचा विजय होतो कधी पराजय होतो. अगदी देवांचा सुद्धा कधी विजय तर कधी पराजय होतो. कधी प्रयत्नांचा विजय होतो कधी पराजय. कधी जीवनाचा विजय होतो कधी मृत्यूचा. कधी प्रेमाचा विजय होतो कधी द्वेषाचा. मग आपण स्वाभाविकपणे एक कौल देतो, आपल्याला पटणाऱ्या बाजूने. आपल्याला suit होईल तो शेवट आपण ठरवतो आणि आपलं म्हणणं सिद्ध करण्याचा उद्योग करतो. थोडा बुद्धीचा ताणतणाव झाला, आपलं वाटणं सिद्ध करताना ओढाताण झाली तर आपण तडजोडीवर येतो आणि हे चक्र फिरत असतं असं म्हणायला लागतो. पण हे चक्र फिरत असतं असं म्हणताना आपल्या हे लक्षात येत नाही की, 'शेवटी विजय सत्याचा होतो' हे वाक्य अर्थहीन ठरतं आहे. कारण चक्र फिरत राहणे याचा अर्थ शेवट नाहीच. अन कधी विजय सत्याचा तर कधी असत्याचा. मनाचा हा गुंता होतो कारण 'सत्याचा विजय' याचा नीट अर्थ आपल्याला प्रतीत झालेला नसतो. सत्याचा विजय याचा अर्थ, मर्यादित सापेक्ष सत्याचा विजय असा नसतो; तर निरपेक्ष, कालातीत, सार्वकालिक, सार्वजनीन, सार्वदेशिक परम सत्याचा विजय असा त्याचा अर्थ असतो. एखाद्या मर्यादेपर्यंत जाऊन थांबणाऱ्या शारीर-मनो-बौद्धिक अस्तित्वाला प्रतीत होणाऱ्या सत्याचा तो विजय नसून, ज्यातून या सगळ्याची सुरुवात आणि ज्यात या सगळ्याचा लय; त्या परम सत्याचा तो विजय असतो. ते परम सत्य कधीच पराभूत होत नाही. दुर्गुण पराभूत होवो की सद्गुण, हिंसा पराभूत होवो की अहिंसा, एखादा गट पराभूत होवो की दुसरा, बुद्धी पराभूत होवो की भावना, एक देश पराभूत होवो की दुसरा, स्त्री पराभूत होवो की पुरुष, प्रेम पराभूत होवो की द्वेष, मृत्यू पराभूत होवो की जीवन; हे विजय आणि पराजय ज्या तत्वातून प्रसूत होतात - ते परम सत्य कधीच पराभूत होत नाही. चांगल्याचा विजय झाला तरी तेच विजयी असते आणि वाईटाचा विजय झाला तरीही तेच विजयी असते. परम सत्य नेहमीच विजयी ठरते.
- श्रीपाद कोठे
११ सप्टेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा