काल महालक्ष्मीच्या मुहूर्तावर एक बातमी झळकली - इ.स. २०३० पर्यंत भारत तिसरी आर्थिक महासत्ता होणार. मनापासून सांगतो, मला थोडं वाईट वाटलं. कारण भारतीयांच्या मनात असलेल्या महालक्ष्मी भावाशी ते विसंगत आहे. महालक्ष्मी सगळ्यांना पोषण देणारी, सगळ्यांना सुख देणारी आहे. सत्ता गाजवणे हा तिचा ना स्वभाव आहे ना धर्म. अन हा केवळ शब्दांचा खेळ नाही. त्यापाठी जीवनाला वेढून टाकणारी आशयगर्भता आहे. सायरस मिस्त्री आणि झुनझुनवाला ही दोन नावे सहजच आठवतात. दोघांचाही अंत फार दुर्दैवी आहे. पण आर्थिक महासत्ता म्हणजे काय याची ती दोन उदाहरणे आहेत. त्यांच्या अकाली अंताबाबत करुणा बाळगूनही एक मान्य करायला हवे की, महासत्तेचा हा भाव स्वीकारणीय नाही. आजचीच एक बातमीही या संदर्भात लक्षणीय आहे. पुणे - देहू या सहा पदरी रस्त्याची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे कदाचित हा रस्ता बारा पदरी करतील, नंतर अठरा पदरी किंवा असेच. किंवा सहा पदरी रस्त्यावर सहा पदरी उड्डाणपूल बांधतील. काहीही केलं तरी ते पुरणार मात्र नाही. मग माणसांना सांगितलं जाईल : बाबांनो, आता तुमच्यासाठी या पृथ्वीवर जागाच नाही. इथे रस्ते, पुल, उड्डाणपूल, विमानतळे, लोहमार्ग, कारखाने बांधायचे आहेत. तेव्हा तुम्ही इथून कुठे निघून जा. आम्ही अब्जावधी रुपये भरपाई देतो. पण जा. अन् मग त्या रस्त्यांचा, पुलांचा, गाड्यांचा उपयोग करायलाही या पृथ्वीवर कोणी उरणार नाही. आमची राक्षसी महत्त्वाकांक्षा, राक्षसी स्वप्ने या भस्मासूरी स्तराला पोहोचली आहेत. मिडास राजाची गोष्ट माणसाने बासनात गुंडाळून ठेवली आहे. हा भस्मासूर केवळ नाही रे वर्गाची कुरकुर नाही हेच मिस्त्री व झुनझुनवाला यांचे अंत सांगताहेत. परंतु ते ऐकण्याची क्षमता कदाचित हा भस्मासूर गमावून बसला आहे.
आध्यात्मिकता ही अपूर्ण आणि असंबद्ध जगात माणसाला शांति आणि समाधान देणारी बाब आहे असे मलाही काही काळ आधीपर्यंत वाटत होते. पण आता हे लख्ख दिसू लागले आहे की, आध्यात्मिकता केवळ आतील अवकाश, आतील पोकळी भरण्यासाठी नाही. बाह्य, ऐहिक जीवनदेखील सुखी व संतुलित करण्यासाठी गरजेची आहे. भारत आणि भारतीय समाज आध्यात्मिक होता, हे विश्लेषण, भारत व भारतीय समाज आध्यात्मिक आहे, येथवर यायला हवे. त्यासाठी भारताने आर्थिक महासत्ता न होणेच इष्ट.
- श्रीपाद कोठे
५ सप्टेंबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा