शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

कष्ट आणि पैसा

वर्तमान व्यवस्थेत केवळ लोकसंख्येचे केंद्रीकरण होत नाही तर; संपत्तीचे, सत्तेचे, निर्णय प्रक्रियेचे, उद्योगांचे, शहरांचे, साधनांचे, बुद्धिमत्तेचे; सगळ्याच गोष्टींचे केंद्रीकरण होते. संपत्तीचे केंद्रीकरण झाल्याने आर्थिक विषमता सतत वाढत राहते. यातून एकीकडे १०२ कोटी रुपये रोज मिळवणारे बोटावर मोजण्याएवढे लोक निर्माण होतात तर, दुसरीकडे अनेक पिढ्या मिळूनही १०२ कोटी रुपये ही स्वप्नापलीकडील बाब ठरणारे बहुसंख्य तयार होतात. यातून खोटी स्वप्ने, फसवे प्रयत्न, खोटी प्रतिष्ठा तयार होत जातात. जगण्यासाठी लागणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी अधिक पैसा गाठीशी असणारे तरीही पैशाकडे धावत राहतात. त्या पैशाचे काय करणार? काय करायचे? कशासाठी? हे प्रश्नही त्यांना पडत नाहीत. पैसा हे एक व्यसन होऊन जाते. अन् ज्यांना जगताना ओढाताण करावी लागते त्यांचा सगळा वेळ त्यातच जातो. त्यांची दृष्टीही अपरिहार्यपणे, नाईलाजाने पैशाकडेच असते. जीवनाचे अन्य पैलू त्यांनाही लाभत नाहीतच.


अब्जावधी रुपये कमावणारी माणसे आपल्या कष्टाने तो कमावतात. कोणाला त्यावर आक्षेप का असावा, असा वरवर बिनतोड वाटणारा प्रश्न केला जातोच. परंतु त्यांच्या या कष्टाची तुलना कष्टकरी व्यक्तीच्या कष्टाशी होऊ शकत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या तथाकथित कष्टात आणखीन काय काय मिसळलेले असते तेही ध्यानात घ्यावे लागतेच. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक शोषण किती होते; विविध ठिकाणी लाच, चापलुसी, दबाव, धमक्या इत्यादींचा वापर किती होतो; वलयाचा गैरफायदा किती घेतला जातो; संबंध कसे तयार केले जातात आणि वापरले जातात; या सगळ्याचा विचार केला तर; रोज करोडो रुपये कमावणाऱ्या लोकांच्या तथाकथित कष्टाची काळी बाजू आपोआप स्पष्ट होते. याशिवाय त्यांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षा समाजातील अन्य घटकांवर जो अप्रत्यक्ष अन्याय करते तोही गुन्हेगारीपेक्षा कमी म्हणता येत नाही.

- श्रीपाद कोठे

२३ सप्टेंबर २०२२

(अनिवासी भारतीयांच्या बाबत आज प्रकाशित एक बातमी वाचल्यावर एकूण वर्तमान अर्थकारणात बद्दल आलेले विचार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा